दुचाकी वाहनासोबत खरेदी करावे लागणार दोन हेल्मेट
परिवहन मंत्रालयाचा आदेश, उत्पादकांना निर्देश

मुंबई / 29 जून: दुचाकी वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे! रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने दुचाकी वाहनांसाठी एक नवीन नियम लागू केला आहे. यापुढे दुचाकी वाहन उत्पादकांना वाहन विक्री करताना खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे अनिवार्य करण्यात येणार आहे. यामुळे दुचाकीस्वार आणि त्याच्यासोबत प्रवास करणार्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे सक्तीचे होणार आहे.
केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मध्ये महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केले आहेत. या नवीन अधिसूचनेनुसार, दुचाकी खरेदी करताना दोन हेल्मेट देणे बंधनकारक केले जाईल. ही अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर तीन महिन्यांतच हा नवीन नियम लागू होईल. या बदलामुळे रस्त्यावर दुचाकी चालक आणि पाठीमागे बसलेल्या प्रवाशासाठीही हेल्मेट वापरणे अनिवार्य होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या हेल्मेट नियमासोबतच, 1 जानेवारी 2026 पासून नवीन एल 2 श्रेणीतील दुचाकी वाहनांना (ज्यांची इंजिन क्षमता 50 सीसीपेक्षा जास्त किंवा वेग 50 किमी/तासाहून अधिक आहे) अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम असणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे अपघातांमुळे होणारे मोठे नुकसान आणि जीवितहानी टाळता येईल, विशेषतः अचानक ब्रेक लावल्याने होणार्या डोक्याच्या किंवा तोंडाच्या दुखापतींना प्रतिबंध बसेल.




