अमरावती शिक्षक निवडणुकीत 26 उमेदवार रिंगणात
युती-आघाडीत बंडखोरांनी चिंता वाढवली

शिंदे सेनेचे सरनाईक यांच्यापुढे डॉ. देशपांडेंचे आव्हान
भाजपचे भोयर, शिंदे आणि पवार रिंगणात ठाण मांडून
काँग्रेसच्या अदिती पोहरे व लहाने यांच्यात चुरस
अमरावती /9 ऑक्टोबर – विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत महायुतीमधील बंडखोर नेत्यांनी माघार न घेतल्याने प्रस्तापित उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे आघाडीच्या उमेदवार कायम राहिल्याने बंडखोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
शिंदे यांच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किरणराव रामराव सरनाईक यांच्या विरोधात माजी आ. प्रा. डॉ. श्रीकांत गोविंद देशपांडे यांनी थेट शड्डू ठोकले आहेत. सोबतच भाजपशी संबंधित चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव भोयर, खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी डॉ. संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे आणि सुमित सुरेशराव पवार यांनीही उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीच्या उमेदवाराला मोठा धक्का बसला आहे.
दुसरीकडे विरोधी महाविकास आघाडीतही अशीच परिस्थिती असून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रा. दत्तात्रय श्रीराम लहाने यांच्यासमोर काँग्रेसच्या उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांचे तगडे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेस नेत्या आ. यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक नेते अदिती पोहरे यांच्या प्रचारात उतरल्याने आघाडीच्या मतांमध्ये फूट पडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
या निवडणुकीसाठी एकूण 31 इच्छुकांनी अर्ज भरले होते. छाननी प्रक्रियेत वंचित बहुजन आघाडीचे गाजी मोहम्मद जाहेरोश यांचा अर्ज बाद ठरल्याने 30 अर्ज वैध ठरले होते. शेवटच्या दिवशी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज चव्हाण, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रीती हर्षल रेवणे, प्रहार जनशक्ती पक्षाचे नितीन आगे आणि साजिद खान खलिद खान या चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता रिंगणात 26 उमेदवार उरले असून लढत कमालीची चुरशीची बनली आहे.
आता रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे किरणराव रामराव सरनाईक, शिवसेना ठाकरे गटाचे दत्तात्रय श्रीराम लहाने, काँग्रेसच्या अदिती ऋषिकेश पोहरे, बळीराजा पक्षाचे प्रा. अनिल मधुकरराव काळे, भारतीय जनसम्राट पक्षाचे गजानन गोविंदराव ढोके आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे सुरेश बाबूराव देवकर यांचा समावेश आहे. याशिवाय अपक्ष म्हणून अविनाश मधुकर बोर्डे, अशोक वामन हिवाळे, आशिष मनोहर अंबुलकर, उपेंद्र बाबाराव पाटील, किरण अर्जुन चौधरी, किरण अर्जुन पवार, गजानन रामचंद्र उल्हे, दिलीप भीमराव कडू, डॉ. प्रशांत विश्वेश्वर विघे, चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव भोयर, मिलिंद तुकाराम ब्राह्मणे, राजेशकुमार शालिग्राम कड, रामदास संपतराव कटक, विनोद प्रल्हाद कडू, प्रा. डॉ. श्रीकांत गोविंद देशपांडे, श्रीकृष्ण सूर्यभान पहुरकर, सुनील दुर्गादास राठोड, डॉ. संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे, सुमित सुरेशराव पवार, प्रा. डॉ. संतोष श्रीकृष्ण हुशे आणि हेमलता दिलीपसिंग मुणोत हे आपले नशीब आजमावत आहेत.
निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. उमेदवार आता थेट शिक्षकांच्या दारात पोहोचून जुनी पेन्शन योजना, वेतनाचा प्रश्न, विनाअनुदानित शाळांचे प्रश्न आणि नोकरीची हमी या मुद्द्यांवर मतदारांना साद घालत आहेत.





