पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकार्याची हत्या
हिंगोली परिसरात उडाली खळबळ

पेट्रोल पंप मालकासह 5 जणांवर गुन्ह
हिंगोली/7 ऑक्टोबर : पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या इंडियन ऑइलच्या अधिकार्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत घडली आहे. चोंढी येथील पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. ताबा घेण्यावरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की, पंप मालक आणि त्याच्या मुलाने कंपनीचे व्यवस्थापक महेश शेळके यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर अधिकार्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इंडियन ऑइल कंपनीचे व्यवस्थापक महेश शेळके हे चोंढी येथील पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी त्यांच्यापथकासह गेले होते. यावेळी पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यावरून कंपनीच्या पथकाची पंप मालकाशी बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर पंप मालक आणि त्याच्या मुलाने महेश शेळके यांच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं जातंय. धारदार शस्त्राने शेळके यांच्यावर वार करण्यात आले. हा हल्ला पेट्रोल पंपाच्या बाहेर झाल्याची माहिती आहे. गंभीर जखमी झालेल्या शेळके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.





