तरुणांच्या नोकरीसाठी कोणाचेही पाय धरायला तयार

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राज ठाकरेंचे विधान

पुणे /5 ऑक्टोबर : ‘महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार आणि न्याय मिळणार असेल, तर त्यासाठी मी कोणाचेही पाय धरायला तयार आहे,’ अशा अत्यंत संवेदनशील शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांपुढे आपल्या भावना व्यक्त केल्या. पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होत त्यांनी सरकारवरताशेरे ओढत विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आज (दि. 5) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित हजारो तरुणांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘मी इथे भाषण करायला नाही, तर तुमच्या रागात सामील व्हायला आलोय,’ अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावनांना हात घातला.
आंदोलक विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, ‘वर्षानुवर्षे अभ्यास करूनही परीक्षा वेळेवर होत नाहीत, निकाल लागत नाहीत आणि लागलेले निकाल रखडतात. ही तुमची वेदना मी अत्यंत जवळून समजू शकतो. परंतु तुमचा हा राग केवळ तात्पुरता रस्त्यावर येण्यापुरता असू नये. हा राग कायम धगधगता राहिला पाहिजे, तरच व्यवस्थेला जाग येईल.’
तरुणांना मोलाचा सल्ला देताना ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी जातीपातीच्या भानगडीत मुळीच पडू नका. राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला जातींमध्ये विभागतील, पण बेरोजगारीला कोणतीही जात नसते. वस्तुस्थिती समजून घ्या, सरकारकडून रोजगाराचे ठोस नियोजन हवे आणि तरुणांना हक्काच्या नोकर्‍या मिळाल्याच पाहिजेत.

Back to top button