हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग : 2 ठार

7 जण जखमी, रुग्णालयात दाखल

आग विझवितांना अग्निशमन दलाचे वाहने पेटले

हिंगोली/5 ऑक्टोबर : हिंगोली शहरातील कपडागल्ली परिसरात फटाक्यांच्या गोदामाला सोमवारी (5 ऑक्टोबर) रात्री पावणेआठच्या सुमारास भीषण आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा साठा असल्याने आगीसोबत जोरदार स्फोट होऊ लागले. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण भाजल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी हिंगोलीतील लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आग विझविताना फटाक्यांच्या स्फोटामुळे अग्निशमन दलाचे वाहनही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील कपडागल्ली भागात गोपाल बासटवार यांचे घर आणि गोदाम आहे. बासटवार हे फटाक्यांचे ठोक विक्रेते असल्याने त्यांच्या गोदामात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा साठा करण्यात आला होता. सोमवारी रात्री साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान गोदामातून अचानक धूर निघू लागला. काही वेळातच गोदामाला आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले.
आग लागल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र गोदामात मोठ्या प्रमाणावर फटाके असल्याने काही वेळातच फटाक्यांचे स्फोट सुरू झाले. स्फोटांच्या मालिकेमुळे आग झपाट्याने पसरली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळा सुमारे 20 फुटांहून अधिक उंच जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
आगीची माहिती मिळताच आमदार संतोष बांगर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र फटाक्यांचे स्फोट सुरूच असल्याने आग विझविण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले.याचदरम्यान झालेल्या स्फोटांमुळे अग्निशमन दलाच्या वाहनालाही आग लागली. या घटनेत अग्निशमन दलाचे 2 कर्मचारी भाजल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरात काही काळ मोठी धावपळ उडाली.
या दुर्घटनेत भरत चौधरी पहेलवान, रमेश चौधरी, अमित चौधरी, नगरसेवक कपील खंडेलवाल आणि शैलेश नांदेडकर यांच्यासह 7 जण भाजल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.दरम्यान, घटनास्थळालगत दोन मृतदेह भाजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. आगीच्या तीव्रतेमुळे मृतदेहांची अवस्था गंभीर झाली असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
या आगीमुळे परिसरातील काही घरांनाही आगीची झळ बसल्याची माहिती आहे. फटाक्यांच्या स्फोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, तसेच गोदामात फटाक्यांचा साठा कोणत्या परवानगीच्या आधारे करण्यात आला होता, याचा तपास सुरू आहे.

Back to top button