रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला

400 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण जखमी

नवी दिल्ली/4 ऑक्टोबर  : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारतीय उद्योगांनाही बसतोय. युक्रेनमधील ’सुमी’ शहरात असलेल्या ’कुसुम ग्रुप’ या प्रमुख भारतीय औषध निर्मिती कंपनीच्या एका मोठ्या प्रकल्पावर रशियाने ड्रोनने हल्ला केलाय. या भीषण हल्ल्यात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक कर्मचारी जखमी झालेत. या ड्रोन हल्ल्यामुळे या प्रकल्पाच्या मुख्य इमारतीचा मोठा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. हल्ला इतका भयान होता की आकाशात उठलेले धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते.
हाती आलेल्या माहितीनुसार, युद्धाच्या अत्यंत धोकादायक परिस्थितीतही, ’कुसुम ग्रुप’चा हा प्रकल्प अविरतपणे कार्यरत होता. जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करत होता. प्राथमिक अंदाजानुसार, या हल्ल्यात प्रकल्पाचे सुमारे 400 कोटी रुपयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून जीवितहानीच्या आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ’द’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय.
भारतीय नागरिक राजीव गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील ’कुसुम ग्रुप’ने 1994 मध्ये औषध वितरक म्हणून आपल्या कामकाजास सुरुवात केली. 2002 नंतर, कंपनीने आपले लक्ष स्वतःचे ब्रँड्स विकसित करण्यावर आणि त्यांच्या विपणनावर केंद्रित केले. या समूहाने 2007 मध्ये भारतात आणि 2009 मध्ये युक्रेनमधील सुमी येथेमोठे उत्पादन प्रकल्प उभारले. सध्या ही कंपनी 50 हून अधिक उत्पादनांची निर्मिती करते. झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत रशियाने युक्रेनवर 135 ड्रोन डागल्याचा दावा केला. त्यापैकी 50 हून अधिक ड्रोन जेट-चालित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कीव्ह, निप्रो, खार्कीव्ह, डोनेत्स्क, सुमी आणि झापोरिझिया या भागांना हल्ल्याचे लक्ष्य करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button