सहा महिन्यात 11 हजार जणांना अतिसाराची लागण
एकट्या मे महिन्यात 2, 817 रुग्ण

-टायफॉइडने फणफणले 1833 रुग्ण
-दुषित पाणी मुख्य कारण
चांदूरबाजार / 29 मे: अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. अशा या दूषित पाण्यामुळे जिल्ह्यात जलजन्य आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यात अतिसाराची लागण झालेल्या 11 हजार 140 जणांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात मे महिन्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल 2 हजार 817 जणांना अतिसारची लागण झाल्याची नोंद आहे. अवेळी आहार, दूषित अन्न किंवा पाणी आणि काही औषधांच्या सेवनामुळे पोटाचे विकार होतात. यामध्ये डायरिया म्हणजेच अतिसार हा त्यापैकीच एक विकार आहे. सर्वसामान्यपणे लहान, तसेच किशोरवयीन मुलांमध्ये हा आजार दिसून येतो. या वयोगटामधील मुलांना जास्त प्रमाणात जुलाब झाल्यास शरीरातील पाणी कमी होऊन स्थिती गंभीर होऊ शकते.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला अतिसार होतो, त्यावेळी त्याच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम होतो. यामुळे त्या व्यक्तीला सैल आणि पातळ शौचास होते. अतिसाराचे हे एक सामान्य लक्षण असून, ते फारसे गंभीर नसते. बर्याच लोकांना वर्षातून काही वेळा जुलाबाचा त्रास होतो. काही लोकांना हा त्रास जास्त प्रमाणात होतो आणि दोन ते तीन दिवसांत तो बरादेखील होतो.
जिल्ह्यात मे महिन्यात टायफॉइडचे 332 रुग्ण आढळल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने घेतली आहे, तर जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये 1833 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. टायफॉइड हा आजार कोणत्याही व्हायरसमुळे पसरत नाही तसेच हा संसर्गजन्य आजारही नाही. दूषित पाणी आणि दूषित अन्न या गोष्टी प्रामुख्याने टायफॉइड होण्यासाठी जबाबदार आहेत. त्या टाळल्यास तसेच ताजे अन्न व स्वच्छ पाण्याचा वापर केल्यास हा आजार पळवून लावला जाऊ शकतो.
-55 ठिकाणचे पाणी नमुने दूषित
जलजन्य आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने ग्रामीण भागात तपासलेल्या एकूण पाणी नमुन्यामध्ये 21 ठिकाणचे पाणी नमुने हे दूषित आढळून आले आहेत. तर महापालिका व नगरपालिका क्षेत्रात 33 ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळून आल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. पावसाळ्यामध्ये विविध कारणांमुळे ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत 11 हजार 140 रुग्णांना अतिसाराची लागण झाल्याची नोंद आहे. गतवर्षी मेळघाटातील अनेक गावांमध्ये अतिसारचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले होते.




