राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी जनआंदोलनाची हाक
महारॅलीच्या माध्यमातून ग्रामगीतेचा सूर घुमला, 21 ऑक्टोंबर पासून गुरुकुंज मोझरीत जनआंदोलन

अमरावती/28 सप्टेंबर : या भारतात बंधुभाव नित्य वसू दे… असा खंजिरीच्या तालावर विश्वाला मानवतेचा आणि ग्रामविकासाचा संदेश देणारे युगपुरुष, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न बहाल करण्यात यावा, या मागणीने आता अमरावतीच्या भूमीत पेट घेतला आहे. जनमनाचा हा प्रखर आवाज शासनकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळा समिती, अमरावती यांच्या पुढाकाराने शहरात एका भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये सकाळी 12 वाजता संत गाडगे महाराज यांच्या समाधीस्थळापासून सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालय नेण्यात आले.
स्वातंत्र्यलढ्यात आपल्या भजनांच्या ललकारीने क्रांतीची मशाल पेटवणारे आणि स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामसुधारणेची गंगोत्री घराघरांत पोहोचवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधून तिवसा तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर, आता संपूर्ण महाराष्ट्रातून या मागणीची लाट उसळली आहे. त्यामुळे राष्ट्रसंतांचे विचार आणि समाजकार्याचा आवाका पाहता, त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करून जनभावनांचा सन्मान करावा. त्यासाठी येत्या 21 ऑक्टोंबर पासून गुरुकुंज मोझरी येथील समाधीस्थळ परिसरात बेमुदत जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
याच भावनेचा हुंकार देत, मनोहर वामनराव साबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अमरावतीचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती, मा. पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री यांच्याकडे आग्रही निवेदन सादर केले. अमरावतीतील हजारो नागरिकांनी आणि गुरुदेव भक्तांनी या महारॅलीत सहभागी होऊन राष्ट्रसंतांच्या अलौकिक कार्याचा यथोचित गौरव करण्याची मागणी लावून धरली आहे. यावेळी मनोहर साबळे, प्रा. प्रकाशराव बोके, प्रा. मनोज भिष्णूरकर, गणेशराव जगताप, प्रशांत कांबळे, शफिक शहा, भास्करराव भटकर, इंजी. पवन दवंडे, बाबूराव धोटे, मनोज दिगांबरे, काळे महाराज, राजेश घोराड, मुकुंद पुणसे, विलास साबळे, शारदा फुके, वैशाली ठाकरे, प्रगती तिडके, सुनील देशमुख,गजानन देशमुख, गंगाधर श्रीखंडे, अरुण तडस यांच्यासह वाशिम, नागपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांतून शेकडो गुरुदेव भक्तांची यावेळी उपस्थिती होती.





