मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना

हजारो आंदोलक शेकडो वाहनांसह ताफ्यात दाखल

वडीगोद्री/15 सप्टेंबर  : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसलेले आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील अखेर मंगळवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सुरुवातीला मोजक्या गाड्यांसह निघण्याचे नियोजन असताना प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात होताच हजारो आंदोलक शेकडो वाहनांसह त्यांच्या ताफ्यात सामील झाले.
उपोषणाच्या 18 व्या दिवशी मुंबईसाठी प्रस्थान करणार्‍या जरांगे पाटील यांना निरोप देताना अंकुशनगर येथे अत्यंत भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. रस्त्यावर खाली बसून त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली, यावेळी जरांगे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलांचे अश्रू अनावर झाले. यावेळी जरांगे यांच्या पत्नीने त्यांच्या गळ्यात कवड्याची माळ घालून निरोप दिला.अंकुशनगर येथे धुळे-सोलापूर महामार्गावर जरांगे पाटील यांचे कुटुंबीय त्यांच्या स्वागतासाठी आणि निरोपासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या मुलीने सरकारला अत्यंत आक्रमक शब्दांत इशारा दिला. सरकारने माझ्या वडिलांची काळजी घ्यावी, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगण्यास तयार राहावे. जर त्यांच्या जीवाला काही झाले, तर सरकारला महाराष्ट्रात लपायला जागा उरणार नाही! आरक्षण द्यायचे नाही हे सरकारने एकदा स्पष्ट सांगावे, मग मराठे आरक्षण कसे खेचून द्यायचे नाही हे सरकारने एकदा स्पष्ट सांगावे, मग मराठे आरक्षण कसे खेचून आणायचे ते दाखवून देतील. दरम्यान, आतापर्यंत दोनदा परत पाठवले, पण आता सरकारने हक्काचे आरक्षण देऊन उपोषण सोडवावे आणि त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी जरांगे यांच्या पत्नीने केली.
मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. यामध्ये 3 उपविभागीय पोलीस अधिकारी, 10 पोलीस निरीक्षक, 30 पोलीस उपनिरीक्षक, 200 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 490 पोलीस कर्मचारी आणि 265 होमगार्ड यांचा समावेश आहे.

Back to top button