संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीचे उदघाटन
8 महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे मान्यवरांचे शुभहस्ते विमोचन

अकोला/13 सप्टेंबर– डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय 54 व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन, रोजगार हमी व खार जमीन विकास मंत्री भरत गोगावले, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे(अभासी प्रणालीद्वारे), वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तथा कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल यांचेसह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू. डॉ.विलास खर्चे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी आदी मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 8 महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. त्यामध्ये ‘डॉ. पंदेकृवि आदर्श गाव कार्यक्रम-हस्तक्षेपातून परिवर्तनाकडे, शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करणे’ आणि शास्त्रज्ञ-शेतकरी मंच : प्रेरणादायी यशोगाथा’ या दोन विशेष पुस्तकांचा समावेश आहे.
कार्यक्रमावरील पुस्तकात विदर्भातील 11 जिल्ह्यांतील 11 गावांमध्ये तीन वर्षांत झालेल्या परिवर्तनाचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. कार्यक्रमामुळे गावांचे एकूण वार्षिक उत्पन्न 14.09 कोटींवरून 35.41 कोटींपर्यंत म्हणजे 151 टक्क्यांनी, तर सरासरी शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.03 लाखांवरून 2.42 लाखांपर्यंत म्हणजे 135 टक्क्यांनी वाढले. पीक उत्पादकतेत 39 टक्के वाढ झाली असून उत्पादन खर्चात 51.21 टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे. या सर्व बाबींचे सविस्तर विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले असून या पुस्तकाचे लेखक डॉ. शरद गडाख, डॉ. डी. बी. उंदिरवाडे, डॉ. एन. आर. कोष्टी आणि डॉ. यू. आर. चिंचमलातपुरे आहेत. यासोबतच विद्यापीठाच्या पुढील सहा प्रकाशनांचेही विमोचन करण्यात आले.





