2001 पूर्वी नियुक्त शिक्षकांनाही पदोन्नतीसाठी ‘टीईटी’ अनिवार्य

औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय

मुंबई/13 सप्टेंबर– 2001 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही पदोन्नती मिळवायची असल्यास शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. जुन्या नियुक्तीच्या शिक्षकांना टीईटीच्या अटीतून सूट मिळावी, हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला.
न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी, न्यायमूर्ती आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. रघुनाथ शंकर झावरे यांच्यासह 57 शिक्षकांनी पदोन्नतीसाठी टीईटीची अट लागू करण्यास आव्हान देत याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांनी सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने 29 जुलै 2026 रोजी याचिका क्रमांक 1219/2026 मध्ये दिलेल्या निर्णयाचा आधार घेतला. 2001 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीची अट लागू होत नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

कोल्हापूर खंडपीठाच्या निर्णयावरही परिणाम

15 एप्रिल 2026 रोजीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती कोल्हापूर खंडपीठासमोरील सुनावणीवेळी निदर्शनास आणून देण्यात आली नव्हती, असे औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयांचा विचार करून खंडपीठाने 57 शिक्षकांचा दावा फेटाळून लावला.

Back to top button