‘रोसा-एक संघर्ष’ कादंबरीचे प्रकाशन
मराठी साहित्यात मानवी हक्काचा बुलंद आवाज

नागपूर /13 सप्टेंबर : ‘रोसा-एक संघर्ष’ ही कादंबरी रोसा पार्क यांच्या संघर्षमय आयुष्यावरील कादंबरी असून, त्यासह कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराचा पटही यात अत्यंत प्रभावीपणे उलगडतो. अमेरिकेतील मानवी हक्काचा आवाज बनलेल्या रोसाचे अत्यंत उत्कट आणि जिवंत चित्रण लेखिका निमा बोडखे यांनी या कादंबरीतून केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.
शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित निमा बोडखे लिखित ‘रोसा : एक संघर्ष’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा मंगळवारी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या धनवटे सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र शोभणे होते. लेखिका आणि वक्त्या डॉ. लीना निकम यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी लेखिका डॉ. अरुंधती वैद्य आणि पत्रकार पराग मगर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कादंबरीचे प्रकाशन करताना डॉ. लीना निकम यांनी कादंबरीच्या साहित्यिक मूल्यावर विशेष प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, मराठी साहित्यात रोसाच्या संघर्षावर आणि संपूर्ण जीवनावर लिहिलेली ही पहिलीच कादंबरी आहे. त्यामुळेच या कृतीला एक वेगळे आणि अनन्यसाधारण साहित्यिक मूल्य प्राप्त झाले आहे. वेदनेची भाषा आणि अन्यायाची भाषा मग ती कुठल्याही देशातील असो वा प्रांतातील… ती अखेर स्त्रीचीच भाषा असते आणि ती सगळीकडे सारखीच असते. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, कादंबरीची भाषा ओघवती, प्रवाही आणि चित्रदर्शी आहे. यात साधलेली संवादात्मकता हे या कादंबरीचे अत्यंत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असून, रोसा हे व्यक्तिमत्त्व वाचकांच्या मनात कायमचे घर करते.ङ्गकार्यक्रम प्रसंगी बोलताना पत्रकार पराग मगर यांनी कादंबरीतील शैक्षणिक आणि सामाजिक मूल्य अधोरेखित केले. ही दर्जेदार कादंबरी अधिकाधिक वाचकांपर्यंत, विशेषतः युवा पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत आणि विविध माध्यमांचा कसा वापर करता येईल, याविषयी त्यांनी काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक विचार मांडले. तर डॉ. अरुंधती वैद्य यांनी, या कादंबरीमुळे मराठी कादंबरीविश्वाला एक जागतिक आणि वैश्विक परिमाण प्राप्त होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रारंभी, लेखिका निमा बोडखे यांनी अत्यंत सुंदर आणि ओघवत्या शब्दांत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच आपल्या मनोगतातून कादंबरीच्या लेखनामागील पार्श्वभूमी, संघर्ष आणि मुख्य प्रेरणा उपस्थितांसमोर मांडली.कार्यक्रमाच्या शेवटी पराग बोडखे यांनी उपस्थितांचे आणि आयोजकांचे आभार मानले. या सोहळ्याला साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, साहित्यिक, विचारवंत आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





