जामवसू खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक

गुन्हात वापरलेले बोलेरो पिकअप वाहन जप्त

अकोला /13 सप्टेंबर – बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या जामवसू येथील जागेच्या वादातून झालेल्या हत्या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 11 सप्टेंबर 2026 रोजी जामवसू ता. बार्शीटाकळी येथील जगदीश मखराम जाधव वय 38 वर्ष यांनी बार्शीटाकळी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली की आरोपी नामे बबन घुगे याने घराजवळील जागेच्या वादावरून संगणमत करून फिर्यादी सोबत भांडण करून अश्लील शिवीगाळ केली व फिर्यादीचे कुटुंबाला जीवे मारण्याच्या उद्देशाने हेतू पुरस्कार फिर्यादीच्या आईच्या अंगावर पिकअप गाडी क्र.एम एच 30- एल 4495 आणल्याने आईच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने ती मरण पावली तसेच फिर्यादीचे भाव व बहिणीला गंभीर दुखापत झाली असा नियोजित कट रचून खून करून गंभीर दुखापत केली. सदर तक्रारीवरून बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. घडलेल्या गुन्ह्याच्या गांभीर्य पाहता अकोला पोलीस अधीक्षक यांनी गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेण्याकरिता परि. पोलीस उपअधीक्षक आनंद कांदे प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन बार्शीटाकळी यांना आदेशित केले त्यांनी बार्शीटाकळी पोलीस पथकासह नमूद आरोपींचा गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन गुन्ह्यातील एकूण 3 आरोपींना अटक केली तसेच आरोपीने गुन्हात वापरलेली बोलेरो पिकप वाहन जप्त करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी आनंद कांदे व बार्शीटाकळी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास बार्शीटाकळी परि. पो. उप. अधीक्षक आनंद कांदे करीत आहे.

Back to top button