17 सप्टेंबरपासून देशभर ‘सेवा संकल्प अभियान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिनाभर विविध उपक्रम

नवी दिल्ली/13 सप्टेंबर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली. हे अभियान 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर असे संपूर्ण महिनाभर चालणार असून, एनडीए परिवारातील घटक पक्ष, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिक यांच्या सहभागातून देशभरातील प्रत्येक जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदींचा वाढदिवस ‘सेवा सप्ताहा’च्या माध्यमातून साजरा केला जात होता. यंदा मात्र या उपक्रमाचा कालावधी वाढवून महिनाभराचे अभियान आयोजित करण्यात आले आहे.
अमित शाह यांनी सांगितले की, यंदाच्या वर्षाला विशेष महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 ऑक्टोबर 2026 रोजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. एका राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून सलग 25 वर्षे जनतेची सेवा करण्याचा विक्रम मोजक्या नेत्यांच्या नावावर आहे, असे त्यांनी नमूद केले. मोदींची सातत्याने झालेली पुनर्निवड, प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाला मिळालेला जनतेचा कौल आणि देशाच्या तसेच राज्याच्या कल्याणासाठी गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेली त्यांची लोकसेवा ही महत्त्वाची उपलब्धी असल्याचे शाह यांनी सांगितले. हे अभियान देशातील राज्ये व केंद्रशासित प्रदेश, जिल्हे, लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ तसेच प्रत्येक बूथपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
2014 पूर्वी देशाच्या राजकारणावर भ्रष्टाचार, जातीयवाद आणि घराणेशाहीचा प्रभाव होता, असा दावा अमित शाह यांनी केला. 2014 ते 2026 या काळात देशाने कामगिरीवर आधारित राजकारणाकडे वाटचाल केली असल्याचे त्यांनी सांगितले. भारताचे परराष्ट्र आणि संरक्षण धोरण ‘इंडिया फर्स्ट’ या भूमिकेवर आधारित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून, देश ‘फ्रजाइल फाइव्ह’मधून अव्वल पाच अर्थव्यवस्थांच्या गटात पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. अलीकडील आकडेवारीनुसार 7.8 टक्के जीडीपी वाढीसह भारत प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये आघाडीवर असल्याचे शाह यांनी सांगितले. कलम 370, नक्षलवाद आणि ईशान्य भारतातील परिस्थिती या दीर्घकाळ प्रलंबित समस्यांवर सरकारने तोडगा काढल्याचेही त्यांनी नमूद केले. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशातील प्रत्येक घुसखोराला बाहेर काढले जाईल, असा दावा करत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सर्व 21 राज्यांमध्ये 2029 पूर्वी समान नागरी संहिता लागू करण्याचा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.

Back to top button