तंत्रज्ञानाचे रूपांतर शस्त्र म्हणून केल्यास ब्रिक्स राष्ट्रांच्या प्रगतीत अडथळा

पंतप्रधान मोदी यांचे ब्रिक्सच्या परिषदेत वक्तव्य

समारोप प्रसंगी विविध राष्ट्रांमध्ये समन्वयांवर चर्चा

नवी दिल्ली/13 सप्टेंबर : भारताची राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. या दुसर्‍या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिषदेत तंत्रज्ञान आणि खनिजांसंदर्भात महत्त्वाचे भाष्य केले. तंत्रज्ञान आणि अत्यावश्यक खनिजांचे रूपांतर शस्त्र म्हणून केल्यास ब्रिक्स राष्ट्रांच्या प्रगतीत अडथळा निर्माण होऊ शकतो. खरंतर तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याच्या प्रक्रियेत सर्वांना सहभागी करून घेतले पाहिजे, असा संदेश पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स राष्ट्रांना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे म्हटले की, भारताच्या ब्रिक्सच्या अध्यक्षतेदरम्यान नावीन्य, सहकार्य इत्यादींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या दूरदृष्टीनुसार, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, डिजिटल कृषी सारखे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, तंत्रज्ञान आणि आवश्यक खनिजांचे रूपांतर शस्त्र म्हणून केल्याने प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो. ब्रिक्स देशांनी तंत्रज्ञान स्वीकारताना सर्वसमावेशक दृष्टिकोनावर भर दिला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाचे फायदे मोजक्या देशांसाठी मर्यादित न ठेवता, शक्य होईल तितक्या देशांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचेल, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भविष्यात तंत्रज्ञानाच्या विकासात ग्लोबल साउथच्या देशांचा समान सहभाग झाला पाहिजे.शेती व्यवसायावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? तंत्रज्ञानाचा वापर आता शेती क्षेत्रातही केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स शिखर परिषदेतही डिजिटल शेती व्यवसायावर महत्त्वाचे भाष्य केले. तंत्रज्ञानामुळे शेतकर्‍यांसाठी नवीन संधी निर्माण होतील, असे त्यांनी पुढे सांगितले. आता एआय, डिजिटल सुविधा शेतकर्‍यांच्या गरजांशी जोडल्या जात आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी आणि शेतकर्‍यांच्या गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
पंतप्रधान मोदींनी या परिषदेत ब्रिक्स इनक्युबेटर नेटवर्क आणि स्टार्टअप इनोव्हेशन फंडाचा उल्लेख केला. सदर नेटवर्क हे ब्रिक्स देशातील स्टार्टअप्स आणि इनक्युबेटर्सना जोडण्यासाठी आहे. तसेच मोदींनी ब्रिक्स लॉजिस्टिक्स सप्लाय चेन कोऑपरेशन फ्रेमवर्कचाही उल्लेख केला. यामुळे पुरवठा साखळ्या अधिक विश्वासार्ह आणि मजबूत होतील, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

भारत-चीन संबंधांवर 7 महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती
ब्रिक्स शिखर परिषदेतून भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. ब्रिक्स शिखर परिषदेत भारत आणि चीनमधील संबंधांना नवी दिशा देण्याचे संकेत मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील चर्चेत दोन्ही देशांनी परस्पर विश्वास आणि सहकार्य वाढवण्यावर भर दिला. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांत सीमा व इतर मुद्द्यांवरून तणाव निर्माण झाला होता. मात्र, ब्रिक्सच्या व्यासपीठावरून दोन्ही देशांनी मतभेद संवादातून सोडवण्याबरोबरचआर्थिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक सहकार्य वाढवण्याची भूमिका मांडली. तसेच, या ऐतिहासिक परिषदेत दोन्ही देशांमध्ये 7 महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती दर्शवण्यात आली आहे. तर, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही भारत आणि चीन हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले दोन देश तसेच ’ग्लोबल साउथ’मधील महत्त्वाचे सदस्य असल्याचे नमूद केले. त्यामुळे दोन्ही देशांवर मोठी जबाबदारी असून त्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिक्स शिखर परिषदेत जागतिक नेत्यांना संबोधित करताना मोदी यांनी, आपली विविधता ही आपली ओळख राहावी आणि आपले सहकार्य ही आपली प्रेरणा बनावी, असा संदेश दिला.

भारताने साधला ब्रिक्समध्ये समान सूर
नवी दिल्लीत पार पडलेल्या दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध देशांचे प्रतिनिधी मायदेशी रवाना झाले आहेत. परिषद कितपत यशस्वी ठरली, याबाबत तज्ज्ञांकडून सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. सदस्य देशांमधील मतभेदणि परस्परविरोधी भू-राजकीय भूमिका असतानाही त्यांना एका समान भूमिकेवर आणण्यात भारताला यश मिळाले असून, त्याचे प्रतिबिंब नवी दिल्ली घोषणापत्रात उमटल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या जिंदाल स्कूल ऑफ इंटरनॅशनल अफेअर्सचे डीन प्राध्यापक डॉ. श्रीराम चौलिया यांनी या परिषदेच्या निष्कर्षांना भारताच्या मुत्सद्देगिरीचे आणि बहुपक्षीय सहभागाचे उल्लेखनीय यश संबोधले. विविध सदस्य देशांमधील मतभेद आणि विरोधाभास हाताळत सर्वांना किमान समान भूमिकेवर आणणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिक्सचा विस्तार झाल्यानंतर मतभेद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र भारताने सदस्य देशांमधील विविधतेला अडथळा न बनू देता तिचे सामर्थ्यात रूपांतर केल्याचे चौलिया यांनी नमूद केले.

ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही; शी जिनपिंग अमेरिकेवर भडकले
ब्रिक्स समिट 2026 मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्यासोबतच ग्लोबल साउथच्या भूमिकेवर भर दिला. जग वेगाने बदलत आहे, प्रत्येक जण कायमस्वरूपी बलवान राहू शकणार नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करत म्हटले की, शी जिनपिंग यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रिक्स समिटच्या आयोजनाबाबत आभार मानले आहेत. आज जगात मोठे आणि ऐतिहासिक बदल होत आहेत, अशावेळी विकसनशील देशांची एकजूट आणि त्यांचा वाढता प्रभाव जगाला मल्टीपोलर बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.जगाची सध्याची स्थिती अस्थिर : जिनपिंग शी जिनपिंग यांनी जगाची सध्याची स्थिती अस्थिर असल्याचे सांगितले. सध्याची स्थिती जोखीम आणि आव्हानांनी भरलेली आहे. ब्रिक्स देशांनी पुढे येऊन नेतृत्व स्वीकारले पाहिजे. विकसनशील देशांनी एकजूट करत जगात शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी सकारात्मक ताकद म्हणून काम केले पाहिजे, असे जिनपिंग म्हणाले.

Back to top button