परीक्षा केंद्रांचे फॉरेन्सिक ऑडिट आणि एफआयआर दाखल करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश

मुंबई/13 सप्टेंबर : महाराष्ट्रातील MHT-CET परीक्षेबाबत उपस्थित झालेले विविध प्रश्न आणि अनियमिततेच्या तक्रारींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. रविवारी, राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी परीक्षेबाबतच्या आपल्या तक्रारी आणि अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्टपणे मांडल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांनी मांडलेले सर्व मुद्दे अत्यंत बारकाईने ऐकून घेतले. त्यानंतर लगेचच, त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर कठोर कारवाई करण्याचे कडक आदेश दिले.
ज्या परीक्षा केंद्रांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत, त्या सर्व केंद्रांचे फॉरेन्सिक ऑडिट केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच, शिक्षकांनी दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे पोलीस एफआयआर नोंदवतील आणि सह-पोलीस आयुक्त दर्जाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करतील. याव्यतिरिक्त, परीक्षेशी संबंधित माहिती (डेटा) लीक झाल्याच्या आरोपांचीफॉरेन्सिक तपासणी करण्याचेही आदेश देण्यात आले असून, या तपासणीवरही सह-पोलीस आयुक्तांचे देखरेख असेल.या अनियमितता किंवा गैरप्रकारांमध्ये दोषी आढळणार्या कोणाचीही गय केली जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, तपास त्वरित सुरू व्हावा यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना आवश्यक ते सर्व आदेश तातडीने देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.





