बैठका घेऊन सरकार फक्त षडयंत्र रचत आहे
मनोज जरांगेंचा संताप; शिंदेंवरही जहरी टीका

जालना /9 सप्टेंबर : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे गेले 11 दिवस जालना येथील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. अशामध्ये सरकारशी चर्चा होऊनही त्यांनी उपोषण मागे घेण्यासाठी नकार दर्शवला. सरकारकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने बुधवारी (9 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंनी आपला जाहीर संताप व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये बसून यांचे दंगल घडवण्याचे षडयंत्र सुरु आहे. एकनाथ शिंदेंना मराठ्यांमध्ये मारामार्या घडवून आणायच्या आहेत. असे म्हणत टीका केली.
माध्यमांसमोर मनोज जरांगे म्हणाले की, हे लोक (मंत्री उदय सामंत, भाजप आमदार प्रसाद लाड आणि शिष्टमंडळातील नेते) छत्रपती संभाजीनगरमध्ये बसून 3 दिवसांपासून षडयंत्र रचत आहेत. हा सर्व राजकीय स्टंट आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. उदय सामंत आणि संजय शिरसाट यांच्यात फोनवर काय संभाषण झाले, हे सर्वांना ठाऊक आहे. सत्ताधार्यांनी गुंड पाळले असून ते आमच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांनी ठरवून मराठ्यांना मिळणारी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला. एकनाथ शिंदे यांनी लवकर शहाणे व्हावे, नाहीतर ते एका फटक्यात संपतील. तुम्ही सत्तेत आहात म्हणून आम्ही तुम्हाला मोजत नाही. उद्या सत्तेत नसल्यावर काय मोजणार? असा सवाल त्यांनी यावेळी केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे ज्या पद्धतीने बोलत असून ते रुचले नाही, असे म्हणत मंत्री शंभुराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली. यावर मनोज जरांगे म्हणाले की, तुम्हाला रुचले नसून मराठा समाजाला रुचले आहे. तुमच्या अंगाला लागलेल्या वळाची किंमत आम्हाला होती. एकनाथ शिंदेंना नव्हती आणि कुणालाही नव्हती. तुम्ही मराठ्यांचा वाटोळे केले आहे. एकनाथ शिंदेंवर टीका करायची नाही म्हणता. मग, शिरसाटांकडून शिंदेंनी मराठ्यांची प्रमाणपत्रे रद्द करून घेतली. तेव्हा, कुठे गेला होता तुम्ही? आता जास्त दिवस चालणार नाही. तुमचे दिवस भरत आले आहेत, असा इशारा त्यांनी दिला.





