पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी न्यायालयाचा सवाल

दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
मुंबई /9 सप्टेंबर : पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन खरेदी व्यवहार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करणार्यात खारगे समितीच्या अहवालात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नव्हता. तसेच पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रातही पार्थ पवार यांच्या नावाचा समावेश नव्हता.
एकंदरीत या प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली असल्याचे स्पष्ट होते. मात्र आता मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकल पीठासमोर मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीवेळी माधव जामदार यांनी मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? असा प्रश्न विचारला आहे. तसेच या जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी देखील केली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने न्यायालयाला दोन आठवड्यांत या संदर्भातील उत्तराचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची हमी देण्यात आली. त्याची नोंद घेत न्यायालयाने पुढील सुनावणी 28 सप्टेंबर रोजी ठेवली आहे.





