काँग्रेसकडून राजकीय हेतूसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा वापर

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

नागपूर/28 ऑगस्ट : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेतले आहेत. मात्र तरीदेखील विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधी यांच्या पुढील महाराष्ट्र दौर्‍यापर्यंत आंदोलन पेटते ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. हा प्रकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्यासारखा असून त्यांच्या शैक्षणिक प्रश्नांचा वापर राजकीय हेतूसाठी करण्यात येत असल्याचा आरोप महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. नागपुरात शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा केली असून गरज पडल्यास वारंवार त्यांच्याशी संवाद साधण्याचीही सरकारची तयारी आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याची आमची भूमिका आहे. मात्र, प्रश्न सुटण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू असतानाही आंदोलन सुरू ठेवण्याचा हट्ट धरण्यात येत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करून काँग्रेसकडूनराहुल गांधींचे महाराष्ट्रातील रिलाँचिंग करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि शैक्षणिक संधी वाढविण्यासाठी संवेदनशीलतेने काम करत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविणे हा सरकारचा उद्देश आहे. मात्र, काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा आपल्या नेत्यांचे राजकीय करिअर वाचविण्याची अधिक चिंता असल्याचे या आंदोलनाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे. आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत काँग्रेसला खरोखरच आस्था असेल, तर विद्यार्थ्यांना राजकीय आंदोलनाचे साधन बनविण्याऐवजी काँग्रेसने सरकारसोबत संवाद साधावा. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका. आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका. राहुल गांधी यांच्या राजकीय पुनरागमनासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा वापर करणे महाराष्ट्र कदापि स्वीकारणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button