राज्यात विविध ठिकाणी धावणार ‘राजमाता जिजाऊ’ बस

अमरावती विभागाला नवीन बसेसची प्रतीक्षा

अमरावती /9 एप्रिल– राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी ’राजमाता जिजाऊ’ बस सेवा संपूर्ण राज्यात सुरू केली आहे. असे असले तरी अमरावती जिल्ह्याला अद्याप एकही बस मिळालेली नाही. संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने सुमारे 3 हजार बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या योजनेचा लाभ अमरावती जिल्ह्यातील प्रवाशांना कधी मिळणार, याबाबत अद्याप निश्चिती नाही. ’राजमाता जिजाऊ’ बसमध्ये आरामदायी आसने, वातानुकूलित यंत्रणा, मोबाईल चार्जिंग पॉईंट तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना सुखद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल, असे महामंडळाने म्हटले आहे. मात्र, सध्या जिल्ह्यात लालपरी, ई-शिवाई आणि जुन्या एसटी बसेसच धावत आहेत. जिल्ह्यात लवकरात लवकर ’राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संदर्भात विभागीय नियंत्रक सचिन डफळे यांनी सांगितले की, एसटी महामंडळाद्वारे अत्याधुनिक सुविधांनी युक्त ’राजमाता जिजाऊ’ बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या अमरावती जिल्ह्यासाठी एकही बस प्राप्त झाली नसली, तरी लवकरच या बसेस उपलब्ध होतील.

संबंधित बातम्या

Back to top button