नेपाळच्या दुर्घटनेत अमरावतीच्या दोन महिला पर्यटक सुखरुप

नीता कक्कड व कुमुद महेंद्र यांनी कुटुंबियांना दिली सुखरुप असल्याची माहिती

पर्यटनासाठी 22 ला नागपुरातून गेल्या होत्या नेपाळमध्ये

अमरावती /27 ऑगस्ट– नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनाच्या संकटातून अमरावतीच्या नीता कक्कड आणि कुमुद उमेश महेंद्र या दोन्ही महिला सुखरूप बचावल्या आहेत. कैलास मानसरोवर यात्रेसाठी नागपूरहून निघालेल्या 73 सदस्यीय यात्रेकरूंच्या ताफ्याने पूरग्रस्त भागात संकट ओढवण्याच्या सुमारे आठ तास आधी पुढील प्रवास सुरू केला होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व यात्रेकरू सध्या चीनच्या सीमेवरील सागा परिसरात सुरक्षित पोहोचले आहेत. यात्रेकरूंचे कुटुंबीयही आता चिंतेतून बाहेर आले आहेत.
22 ऑगस्ट रोजी नागपूरहून कैलास मानसरोवर यात्रेसाठी 73 यात्रेकरूंचा ताफा रवाना झाला. सुमारे दीड दिवसांच्या प्रवासानंतर ताफा नेपाळमध्ये पोहोचला. काठमांडूसह विविध धार्मिक आणि पर्यटनस्थळांना भेट दिल्यानंतर यात्रेकरूंनी पुढील प्रवासाला सुरुवात केली. याच काळात नेपाळमधील अनेक भागांना भीषण पुराचा तडाखा बसला आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अमरावतीचे नागरिक आणि व्यावसायिक बकुलभाई कक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात नंतर पुराचे पाणी आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तेथून यात्रेकरूंचा ताफा सुमारे आठ तास आधीच पुढे निघून गेला होता. प्रवासात थोडीही दिरंगाई झाली असती तर ताफा संकटात सापडण्याची शक्यता होती. दरम्यान, नीता कक्कड आणि कुमुद उमेश महेंद्र यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली. बकुलभाई कक्कड यांनीही संपूर्ण ताफा सुरक्षित असल्याचे सांगितले. यात्रेकरूंनी दूरध्वनी आणि अन्य माध्यमांतून आपल्या कुटुंबीयांना सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. सध्या 73 यात्रेकरू चीनच्या सीमेवरील सागा परिसरात पोहोचले असून तेथून कैलास मानसरोवर यात्रेचा महत्त्वाचा टप्पा सुरू होणार आहे. हेलिकॉप्टरऐवजी पारंपरिक मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान साथ दिल्यास येत्या काही दिवसांत कैलास पर्वत आणि मानसरोवराचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू होईल. नियोजित कार्यक्रमानुसार 4 सप्टेंबरला सर्व यात्रेकरू भारतात परतण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Back to top button