सालबर्डीतील माळू-गंगा नदी संगमावर अपघाताचा धोका

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

चिंचोली गवळी /23 ऑगस्ट – चिंचोली गवळीपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वतरांगांमध्ये प्रसिद्ध सालबर्डी महादेवाचे भुयारी देवस्थान आहे. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील हे धार्मिक आणि पर्यटनस्थळ श्रावण महिन्यात भाविकांनी गजबजून जाते. मात्र, माळू नदी व गंगा नदीच्या परिसरात अरुंद रस्ता, पुलावर उभी राहणारी वाहने आणि हत्ती डोहासारखी संवेदनशील ठिकाणे यामुळे येथे मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे.
सालबर्डीकडे जाताना माळू नदी आणि गंगा नदीचा संगम असलेल्या परिसराचा निसर्गरम्य देखावा पाहण्यासाठी अनेक पर्यटक व भाविक आपली वाहने रस्त्यावर तसेच पुलावरच उभी करतात. रस्ता अरुंद असल्याने समोरून येणार्‍या वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. श्रावण महिन्यात तर दुचाकी, चारचाकी तसेच मोठ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताची शक्यता अधिकच वाढते.
याच परिसरात असलेल्या हत्ती डोहात यापूर्वी विविध दुर्घटना घडल्याचे नागरिक सांगतात. काही भाविक व पर्यटकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनांनंतरही या संवेदनशील ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना झाल्या नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. नदी, खोल पाण्याचे ठिकाण आणि अरुंद रस्ता लक्षात घेता धोकादायक ठिकाणी सूचना फलक, कठडे, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे.
विशेष म्हणजे सालबर्डी हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगतचे ठिकाण असल्याने दोन्ही राज्यांच्या प्रशासनाच्या समन्वयाची आवश्यकता आहे. मात्र, नागरिकांच्या म्हणण्यानुसार धोकादायक वळणे, नदी परिसर, पुलावरील वाहन पार्किंग आणि हत्ती डोहाबाबत पुरेसे सूचना फलक अथवा सुरक्षा व्यवस्था दिसून येत नाही. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर मध्य प्रदेशातील प्रभातपट्टण तहसील, जिल्हा बैतूल प्रशासनाच्या माध्यमातून वाहनांकडून पावत्या घेतल्या जात असल्याचेही सांगितले जाते. या पावत्या ‘महादेव जी शिवधाम ट्रस्ट’ या नावाने असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ट्रस्टच्या देखभाल व विकासासाठी हा निधी घेतला जात असल्याचे सांगितले जात असले तरी भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा मात्र अपुर्‍या असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. विशेष बाब म्हणजे वाहनांकडून पावती घेण्यासाठी लावण्यात आलेल्या काही बॅनरवर ‘ग्रामीण पोलीस महाराष्ट्र’ असा उल्लेख असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पावती वसुलीची अधिकृतता, त्यामागील यंत्रणा आणि त्यातून मिळणार्‍या निधीचा वापर नेमका कुठे होतो, याबाबत पारदर्शकता असावी, अशी मागणी होत आहे. मोर्शी, पाला, सालबर्डी, सोनम, पश्मो, आठनेर, बैतूल आदी मार्गाने ये-जा करणार्‍या सामान्य वाहनचालकांकडूनही पावती घेतली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. ट्रस्टच्या विकासासाठी देणगी किंवा शुल्क घ्यायचे असल्यास भुयारी देवस्थानाच्या परिसरात स्वतंत्र वाहनतळ उभारून तेथेच वाहनांची व्यवस्था व पावतीची प्रक्रिया करावी. मुख्य रस्त्यावर वाहतूक अडवून सामान्य प्रवाशांना त्रास देणे योग्य नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. सालबर्डी हे धार्मिक श्रद्धेचे तसेच पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे येणार्‍या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश प्रशासनाने एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी संयुक्तपणे सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरज आहे. धोकादायक ठिकाणी स्पष्ट सूचना फलक, वाहनतळ, संरक्षक कठडे, वाहतूक नियंत्रण, सुरक्षा कर्मचारी आणि आपत्कालीन मदतीची व्यवस्था करणे आवश्यक आहे. अन्यथा एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वेळ येऊ नये, यासाठी सालबर्डी परिसरातील सुरक्षेचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button