मुख्यमंत्र्यांना अमरावतीतून दहीहंडी स्पर्धेचे आमंत्रण
कर्जमुक्त 10 हजार शेतकरी करणार जंगी सत्कार

गोविंदा उत्सवासाठी भाजप नेत्यांचे जय्यत तयारी
अमरावती /18 ऑगस्ट -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमुक्ती मिळालेल्या अमरावती जिल्ह्यातील सुमारे 10 हजार शेतकर्यांच्या उपस्थितीत 27 सप्टेंबर रोजी अमरावती शहरात भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेतकर्यांच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेण्यात आल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ या विशेष सोहळ्याचे आयोजन भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. मुंबई येथे भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या भव्य शेतकरी मेळाव्याचे तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त होणार्या दहीहंडी उत्सवाचे निमंत्रण दिले असून मुख्यमंत्र्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.
राज्यात बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि शेतीचा स्तर सुधारण्यासाठी युद्धपातळीवर काम केले गेले. जलसिंचन योजना, शेतकरी वीज बिल माफी आणिसौर ऊर्जा योजनांचा थेट लाभ जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांना मिळाला आहे. या कर्जमुक्तीच्या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातील बळीराजा चिंतामुक्त झाला असून या सर्व शेतकरी बांधवांच्या प्रतिनिधींच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा भव्य सत्कार या मेळाव्यात केला जाणार आहे. तसेच अमरावतीत यंदा आयोजित ’गोविंदा आला रे’ या दहीहंडी स्पर्धेचे आमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले आहे. मुंबईत भेट घेणार्या शिष्टमंडळात खा. डॉ. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे पाटील, आ. प्रताप दादा अडसड, आ. राजेश वानखडे, श्रीचंद तेजवानी, जयंत डेहणकर, शिवराय कुळकर्णी, चेतन गावंडे, नितीन गुडधे पाटील यांचा समावेश होता. हा मेळावा आणि दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी आ. प्रवीण तायडे, आ. उमेश यावलकर, आ. केवलराम काळे यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष व भाजपचे सर्व पदाधिकारी संयुक्तपणे परिश्रम घेत आहेत.
अमरावतीत रंगणार शेतकरी सन्मान अन् गोविंदा उत्सव
अमरावतीत 27 सप्टेंबरला 10 हजार कर्जमुक्त शेतकर्यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा रंगणार आहे. मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या कर्जमुक्ती, जलसिंचन व वीज बिल माफी योजनांमुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर बळीराजाच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कार होणार आहे. तसेच अमरावतीतील दहीहंडी उत्सवालाही मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती लाभणार असून भाजप पदाधिकारी तयारीला लागले आहेत.




