रिक्षाचालकांसाठी मराठीची भाषा परीक्षा आता अनिवार्य
15 ऑगस्टपासून रिक्षाचालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे अनिवार्य

अमरावती/11 ऑगस्ट– राज्यातील रिक्षाचालकांना प्रवाशांशी मराठीत बोलता यावे यासाठी शासनाने 15 ऑगस्टपासून मराठी बोलणे आणि समजणे अनिवार्य केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने अमरावतीत रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेचे विशेष वर्ग सुरू केले असून मंगळवारी झालेल्या पहिल्या वर्गाला सुमारे 100 रिक्षाचालकांनी उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला. वर्गात प्रवाशांशी दैनंदिन व्यवहारात कशा पद्धतीने मराठीत संवाद साधावा याचे मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर 15 प्रश्नांची लेखी परीक्षा घेण्यात आली असून बहुतांश रिक्षाचालक उत्तीर्ण झाल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी आपली मातृभूमीला दिली.
मुंबई महानगर परिसरातील रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर राज्य शासनाने रिक्षाचालकांना मराठीचे ज्ञान असणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रादेशिक परिवहन कार्यालयांवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार अमरावतीत मराठी बोलता न येणार्या रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र वर्ग घेण्यात येत आहेत. मंगळवारी झालेल्या वर्गात भाषातज्ज्ञ डॉ. मंदा नांदुरकर यांनी रिक्षाचालकांना मराठी भाषेबाबत मार्गदर्शन केले. प्रवाशांशी साधी आणि नम्र भाषा कशी वापरावी, रोजच्या व्यवहारात कोणते शब्द वापरावेत आणि प्रवाशांचे म्हणणे कसे समजून घ्यावे याची उदाहरणांसह माहिती त्यांनी दिली. त्यानंतर रिक्षाचालकांकडून 15 प्रश्नांची परीक्षा घेण्यात आली. अनेक चालकांनी प्रश्नांची उत्तरे सहजपणे दिली. काहींच्या भाषेतील चुका डॉ. नांदुरकर यांनी समजावून सांगत त्या सुधारण्यास मदत केली. या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, लेखा अधिकारी देशमुख, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे आणि डॉ. मंदा नांदुरकर उपस्थित होते. नंदकिशोर काळे यांनी प्रास्ताविक केले. उर्मिला पवार यांनीही रिक्षाचालकांना मार्गदर्शन केले. वर्गाचे संचालन अनिल मानकर यांनी केले. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारचे वर्ग घेतले जात असल्याचे नंदकिशोर काळे यांनी सांगितले. अमरावतीतही पुढील वर्ग घेऊन मराठीचे ज्ञान नसलेल्या रिक्षाचालकांना प्रवाशांशी सहज संवाद साधता यावा यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. 15 ऑगस्टची अंतिम मुदत लक्षात घेता या उपक्रमाला आता वेग आला आहे.अमरावतीतील प्रशिक्षणात रिक्षाचालकांना प्रवाशांशी रोजच्या व्यवहारातील मराठी संवाद शिकविण्यात आला. प्रवाशांचे ठिकाण विचारणे, भाडे सांगणे, मार्ग समजावून देणे, वेळ आणि अंतर सांगणे अशा साध्या बाबी मराठीत कशा बोलाव्यात याची उदाहरणांसह माहिती देण्यात आली. रिक्षाचालकांकडून प्रत्यक्ष वाक्ये बोलून घेण्यात आली. त्यांच्या चुका त्वरित समजावून सांगण्यात आल्या. त्यामुळे वर्गात शिकण्याबरोबर प्रत्यक्ष सरावालाही महत्त्व देण्यात आले.




