परतवाड्यात चिमुकल्याचा छिन्नविछिन्न मृतदेह झुडुपात आढळला

मोकाट कुत्र्यांनी तोडले लचके

निर्दयी आईवडिलांचा शोध घेण्यास पोलिसांचे पथक तैनात

परतवाडा/10 ऑगस्ट ः अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात मेळघाट रक्तपेढीसमोरील झाडाझुडपात अवघ्या 1 ते सव्वा महिन्याच्या लहान चिमुकल्याचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या निष्पाप चिमुकल्याचे लचके परिसरातील भटक्या मोकाट कुत्र्यांनी तोडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, या अत्यंत भयानक आणि काळीज पिळवटून टाकणार्‍या घटनेमुळे नागरिकांकडून तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरताच परतवाडा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून चिमुकल्याचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला व पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. हे निष्पाप बाळ नेमके कोणाचे आहे, त्याचे आई-वडील कोण आहेत आणि इतक्या लहान बाळाला या निर्जन झुडपात कोणी आणून टाकले, याचा कसून शोध पोलीस पथकाकडून घेतला जात आहे.
या मन सुन्न करणार्‍या घटनेनंतर शहरात अनेक संशय आणि गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. निष्पाप बाळाला या ठिकाणीआणून ठेवले तेव्हा ते जिवंत होते की मृत, किंवा अन्य कुठल्या ठिकाणी अघटीत घडून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने येथे आणून टाकला गेला, या सर्व शक्यतेचा पोलीस वेगवेगळ्या कोनातून तपास करत आहेत. परतवाडा पोलीस परिसरातील नागरिकांची चौकशी करत असून, या दुर्दैवी घटनेमागील खरे सत्य शोधण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत.
घटनेमागील सत्य उघडकीस आणण्याचे पोलिसांसमोर आव्हान
मेळघाट रक्तपेढीसमोरील झुडपात आढळलेल्या 1 महिन्याच्या निष्पाप बाळाच्या छिन्नविछिन्न मृतदेहाने संपूर्ण अमरावती जिल्हा हादरला आहे. मोकाट कुत्र्यांनी लचके तोडलेल्या या लहान बाळाला जिवंत फेकून दिले होते की हत्या करून येथे टाकले, याचे गूढ कायम आहे. परतवाडा पोलीस या निर्दयी आई-वडिलांचा वेगाने शोध घेत असून, या भयानक घटनेतील क्रूर सत्य लवकरात लवकर बाहेर आणण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button