राज्यातील शेतकर्‍यांना लवकरच दिवसा मोफत वीज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई/10 ऑगस्ट -शेतकर्‍यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक शेतकर्‍याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली असून, सध्या 74 टक्के शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळत आहे.
यावर्षाअखेर 90 टक्के आणि पुढील वर्षी 100 टक्के शेतकर्‍यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कागलमध्ये विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.
शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकर्‍यांना दिलेले वचन पूर्ण करून आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देण्यात आली असून, 56 हजार शेतकर्‍यांना त्याचा लाभ झाला आहे.
शेतकर्‍यांना मोफत वीज देण्यासाठी शासन दरवर्षी 25 हजार कोटी रुपये खर्च करीत असून, 58 हजार कोटी रुपयांची थकबाकीही शासनाने दिली आहे. आता प्रत्येक शेतकर्‍याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी शिक्षण आणि रोजगाराची दारे खुली केली. 1942 च्या भारत छोडो आंदोलनाच्या क्रांतिकारी पर्वाच्या स्मरणदिनी अशा थोर समाजसुधारकाच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मिळणे ही आपल्यासाठी विशेष बाब आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या काळातील चुकीची सामाजिक व्यवस्था झुगारून नवी सामाजिक व्यवस्था निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि राजर्षी शाहू महाराजांनी दिलेले विचार या त्रिसूत्रीच्या आधारावर राज्य शासन काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button