राज्यातील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर

डॉक्टर संपावर;आकस्मिक कक्षही बंद

मुंबई/5 ऑगस्ट :  महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. नियोजित शस्त्रक्रिया आणि इतर गैर-आकस्मिक वैद्यकीय सेवा बंद केल्यानंतरही सरकारने समाधानकारक निर्णय घेतला नाही, तर गुरुवार, 6 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून आकस्मिक वैद्यकीय सेवाही अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा इशारा खासगी आणि सरकारी डॉक्टरांच्या संघटनांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्यसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डॉक्टरांनी नेमका इशारा काय दिला?

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड), असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (एएसएमआय) आणि सुपरस्पेशालिस्ट राज्य संघटना यांनी संयुक्तपणे आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. 5 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 6 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत नियोजित आणि गैर-आकस्मिक वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबत मुंबईत सरकारसोबत चर्चा सुरू असून त्यात अद्याप काही तोडगा निघाला नाही.

डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणी प्रक्रियेबाबत स्पष्ट कायदेशीर आणि नियामक चौकट तयार करावी, ती प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी तसेच निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित सेवा, प्रशिक्षण आणि कल्याणाशी संबंधित मागण्यांवर त्वरित निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

सरकारवर कोणते आरोप करण्यात आले ?

संघटनांच्या मते, अनेकदा सकारात्मक संवाद साधूनही सरकारने कोणतीही ठोस हमी दिलेली नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता, रुग्णांची सुरक्षितता आणि राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

रुग्णांवर काय परिणाम होऊ शकतो ?

सरकारने वेळेत तोडगा न काढल्यास केवळ नियोजित उपचारच नव्हे, तर आकस्मिक वैद्यकीय सेवांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गंभीर रुग्ण, अपघातग्रस्त आणि तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

संयुक्त आंदोलनात कोण सहभागी आहेत?

या आंदोलनात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड), असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (एएसएमआय) आणि सुपरस्पेशालिस्ट राज्य संघटना सहभागी असून सर्व संघटनांनी एकत्रित भूमिका घेतली आहे.

आकस्मिक सेवा बंद करण्याचा निर्णय का?

संघटनांचे म्हणणे आहे की, सरकारकडून 6 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत ठोस आणि समाधानकारक निर्णय झाला नाही, तर त्यानंतर आकस्मिक (इमर्जन्सी) वैद्यकीय सेवांसह सर्व सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येतील. हा निर्णय रुग्णांच्या हिताविरोधात नसून सरकारच्या निष्क्रिय भूमिकेमुळे घ्यावा लागत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button