मनपा शाळा क्र. 12 मध्ये आरोग्य शिबिर
डेंग्यू, मलेरियाविरुद्ध अमरावतीत जनजागृती अभियान

अमरावती /5 ऑगस्ट: कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत उस्मान नगर येथील मनपा उर्दू शाळा क्रमांक 12 मध्ये भव्य आरोग्य जनजागृती आणि सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात परिसरातील विद्यार्थी, नागरिक आणि पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी आणि साथरोग अधिकारी डॉ. रुपेश खडसे यांच्या सूचनेनुसार तसेच डॉ. सीमा नैताम यांच्या मार्गदर्शनाखाली हैदरपुरा शहरी आरोग्य केंद्राने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक साहिल इकबाल उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक अब्दुल शेख आणि डॉ. अपर्णा मोकले यांची उपस्थिती लाभली.आरोग्य सेवक महेंद्र रामटेके यांनी प्रास्ताविक करताना डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या आजारांची कारणे, लक्षणे आणि गप्पी माशांचा वापर यांसारख्या प्रतिबंधात्मक उपायांची साध्या-सोप्या भाषेत माहिती दिली. डॉ. अपर्णा मोकले यांनी वैयक्तिक स्वच्छता आणि महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन केले. तसेच कुष्ठरोग तज्ज्ञ सीमा चौधरी यांनी त्वचारोग व कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज दूर केले, तर क्षयरोग तज्ज्ञ गजेंद्र देशमुख यांनी क्षयरोगाची लक्षणे व उपचारांची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी आरोग्य परिचारिका सुमाला उपासे, आरोग्य सेविका कांचन पापडकर, आशा स्वयंसेविका आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. परिसर स्वच्छ ठेवून आजारांना दूर ठेवण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन शेवटी करण्यात आले.




