खाऊ गल्लीवर’ लाखोचा खर्च, योजना कागदावरच
रस्त्यावरच हातगाड्या, पालिकेची महत्वाकांक्षी योजना ठप्प

* दिव्यांग अन् महिला बचत प्रतीक्षेत
अमरावती/4 ऑगस्ट- शहरात पदपथावर व्यवसाय करणार्या हातगाडी चालकांना, दिव्यांगांना आणि महिला स्वयं साहाय्यता गटांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने प्रशांत नगर येथे तयार करण्यात आलेली ’खाऊ गल्ली’ योजना लाखो रुपये खर्च होऊनही अद्याप सुरू झालेली नाही.
तीन-चार वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला हा प्रकल्प आजवर कागदावरच मर्यादित राहिला असून, परिसराचा वापर अन्न व्यवसायाऐवजी जप्त केलेल्या साहित्याच्या साठवणुकीसाठी केला जात आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या पुढाकाराने या प्रकल्पाची सुरुवात झाली होती. या योजनेअंतर्गत प्रशांत नगर येथील वर्कशॉप विभागाच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण करून 19 दुकाने तयार करण्यात आली होती. परिसरात पेव्हिंग ब्लॉक, आकर्षक प्रवेशद्वार आणि रंगीबेरंगी म्युरल्स बनवून याला आधुनिक स्वरूप देण्यात आले होते. मात्र बांधकाम पूर्ण होऊनही ही योजना सुरू होऊ न शकल्याने महापालिकेचा महसूल बुडाला आणि लाभार्थ्यांना रोजगाराची संधीही मिळाली नाही. सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या आमसभेत या दुकानांच्या वाटपासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. नियम व अटी तयार करून कायदे विभागाकडे पाठवण्यात आल्या असल्या, तरी संबंधित कर्मचारी विशेष पुनरीक्षण कामात व्यस्त असल्याने टेंडर प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान प्रशांत नगर पार्कसमोर आजसुद्धा मोठ्या संख्येने रस्त्याच्या कडेला हातगाड्या लागत असून महापालिका त्यांच्यावर कारवाईची तयारी करत आहे. त्यामुळे पुनर्वसन न करता कारवाई केल्यास रोजगार कसा चालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेने लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी शहरवासी करत आहेत. प्रशांत नगर येथे लवकरच हातगाडी चालकांवर कारवाईची तयारी करण्याची मागणी केली.




