‘एक झाड आईच्या नावाने’ अभियानांतर्गत मणिबाई गुजराती हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

विद्यार्थ्यांचा पर्यावरण संरक्षणाचा दृढ संकल्प

अमरावती /4 ऑगस्ट- भारत सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे संचलित ’एक झाड आईच्या नावाने’ अभियानांतर्गत ’निसर्गसुधा ऑरगॅनिक फार्म’च्या सहकार्याने स्थानिक मणिबाई गुजराती हायस्कूल व श्रीमती सुलोचनाबेन त्रिकमदास कापडिया ज्युनिअर कॉलेज, अंबापेठ यांच्या वतीने बेलोरा विमानतळाजवळील निसर्गसुधा फार्म येथे वृक्षारोपण आणि पर्यावरण जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता वाढवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संस्कृतीनुसार गो-पूजनाने झाली. अध्यक्षस्थान सीए निलेशभाई लाठिया यांनी भूषवले. मुख्याध्यापिका श्रीमती अंजली देव यांनी अतिथींचे औषधी रोपे देऊन स्वागत केले. प्रसंगी सीए निलेशभाई लाठिया, सचिव अ‍ॅड. संजयभाई सांगानी, अ‍ॅड. शर्मा, किशोर केडिया व भवानीशंकर देव उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात सीए निलेशभाई लाठिया यांनी पर्यावरण रक्षण ही नैतिक जबाबदारी असल्याचे सांगत आईच्या नावाने रोप लावण्याचे आवाहन केले. श्रीमती अंजली देव यांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले, तर अ‍ॅड. शर्मा यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध रोपांची लागवड झाली. सूत्रसंचालन अनिल तिवारी यांनी केले, तर इको क्लब प्रमुख मनिष देशमुख यांनी आभार मानले. शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत निसर्ग संरक्षणाचा संकल्प केला.

Back to top button