पावसाच्या पाण्याचा साचलेला अडथळा दूर होणार

मनपा आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले यांच्यासह उपमहापौर सचिन भेंडे व चेतन गावंडे यांची घटनास्थळी भेट

अमरावती /31 जुलै : अमरावती शहरात संततधार सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि पाणी तुंबण्याच्या समस्येतून मुक्ती मिळवून देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे मैदानात उतरले आहे. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले यांनी शुक्रवारी सकाळी अकोली अंडरपास व साई नगर परिसरात थेट भेट देऊन परिस्थितीचा ग्राउंड झिरोवरून आढावा घेतला.
पावसाच्या पाण्याचा निचरा तात्काळ, सुरळीत व जलद गतीने व्हावा यासाठी पाणी उपसण्याची यंत्रणा अधिक गतिमान करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच भविष्यात शहरात कुठेही पाणी साचून नागरिकांची दैना होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना आखण्याचे स्पष्ट निर्देश सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना दिले आहेत. अकोली अंडरपास हा शहराच्या वाहतुकीचा मुख्य कणा मानला जातो. मात्र मुसळधार पावसात या ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांचे हाल होतात आणि वाहतूक ठप्प पडते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी पाण्याचा निचरा करणार्‍या पंपांची कार्यक्षमता आणि जलनिस्सारण व्यवस्थेची बारकाईने तपासणी केली. साई नगर परिसरातील मुख्य व उपनाल्यांमधील साचलेला गाळ, कचरा आणि पाण्याचा प्रवाह रोखणारे अडथळे त्वरित हटवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पावसाळ्यात रोगराई पसरू नये यासाठी नियमित फॉगिंग, औषध फवारणी व स्वच्छता मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश आरोग्य आणि अभियांत्रिकी विभागाला देण्यात आले. या पाहणी दौर्‍यात उपमहापौर सचिन भेंडे, सभागृह नेते चेतन गावंडे, नगरसेविका लता देशमुख, मंजूषा जाधव, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, धनंजय शिंदे, अविनाश रघटाटे, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बंसोले, उपअभियंता श्रीरंग तायडे, हेमंत महाजन यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button