अकोली अंडरपासमधील साचलेल्या पाण्याची आ.प्रवीण पोटे यांच्याकडून पाहणी
रेल्वे प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना

अमरावती /31 जुलै: मुसळधार पावसामुळे अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडत असून, अकोली अंडरपासमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण पोटे-पाटील यांनी आज, शुक्रवार (दि. 31 जुलै) सकाळी अकोली अंडरपास परिसराला भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.
पाहणीदरम्यान आमदार पोटे-पाटील यांनी रेल्वेच्या अधिकार्यांकडून पाणी साचण्यामागील कारणांची सविस्तर माहिती घेतली. अंडरपासमध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून वाहतूक विस्कळीत होते. काहीवेळा विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच आपत्कालीन सेवांनाही याचा फटका बसतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून अकोली अंडरपासमधील पाणी साचण्याच्या समस्येची गंभीर दखल घेण्याच्या सूचना दिल्या. पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना, जलनिस्सारण व्यवस्थेची सुधारणा तसेच संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कोणत्याही बाबतीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका प्रशासनालाही अंडरपास परिसरात पाणी उपसण्यासाठी आवश्यक यंत्रणा तत्काळ कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सतत देखरेख ठेवून परिस्थितीनुसार त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकार्यांना देण्यात आले. स्थानिक नागरिकांनीही यावेळी आमदार प्रवीण पोटे-पाटील यांच्यासमोर अंडरपासमध्ये वारंवार पाणी साचत असल्याने निर्माण होणार्या अडचणी मांडल्या. यावर त्यांनी नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, अशी ग्वाही दिली. अकोली अंडरपास हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असल्याने येथील पाणी साचण्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे. यावेळी सभागृह नेते चेतन गावंडे, शिवराय कुलकर्णी, किरण पातुरकर, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती लता देशमुख, नगरसेविका मंजुषा जाधव, माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, माजी गटनेते चेतन पवार, उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे, अविनाश रघटाटे, उपअभियंता हेमंत महाजन, अभियंता श्रीरंग तायडे तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




