नाशिकमध्ये पुराचा हाहाकार
गंगापूर धरणातून 14,407 क्यूसेकने विसर्ग सुरू

नाशक/24 जुलै-नाशिक शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून कोसळणार्या मुसळधार पावसाने शुक्रवारी काहीशी विश्रांती घेतली असली, तरी धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. गंगापूर धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आला आहे. परिणामी, रामकुंड परिसरातील ऐतिहासिक ’दुतोंड्या मारुती’ची मूर्ती पूर्णपणे पाण्याखाली गेली असून पुराचे पाणी शहरातल्या मुख्य बाजारपेठांमध्ये शिरले आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला आहे. त्यामुळे प्रशासनानेशुक्रवारी सकाळी 8.15 वाजता धरणातून होणार्या विसर्गात 475 क्यूसेकने वाढ केली. सध्या गंगापूर धरणातून तब्बल 14,407 क्यूसेक वेगाने गोदापात्रात पाणी सोडले जात आहे.पाण्याचा हा विसर्ग वाढल्यामुळे गुरुवारी सायंकाळी ’दुतोंड्या मारुती’च्या मानेपर्यंत असलेले पाणी शुक्रवारी संपूर्ण मूर्तीवर गेले असून मारुतीची मूर्ती पूर्णपणे बुडाली आहे. पुराचे पाणी नदीकाठच्या प्रसिद्ध भांडी बाजार आणि सराफ बाजारात शिरले आहे. गोदापात्रातील अनेक छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली असून रामसेतू पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू आहे.




