48 हजार कोटींची वीज थकबाकी माफ करणार

कर्जमाफीनंतर सरकारनं शेतकर्‍यांसाठी घेतला मोठा निर्णय

शेतकर्‍यांना मिळणार दिवसा 100 टक्के वीज पुरवठा

मुंबई/15 जुलै -राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजासाठी आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. सरकार शेतकर्‍यांच्या साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीमधील वीज जोडणीचं जुने विजबिलं माफ करणार
असल्याची घोषणा केली आहे. शेतीला पाणी देण्यासाठी साडेसात हॉर्स पॉवरचे जे मोटारपंप वापरले जातात त्यांना सध्या बिल येत नाही. मात्र यापूर्वीची जुनी बिलं अजूनही प्रत्येकाच्या नावाने खात्यात जमा आहेत. त्याची वसूली कधीही होऊ शकते.त्यामुळे शेतकरी दुसरं कुठलंही कनेक्शन घ्यायला गेला तर त्याला ते मिळत नाहीये. परंतु महायुती सरकारने ही 48 हजार कोटी रुपयांची जुनी बिलं माफ करण्याचा निर्णय घेतलाय. शेतकर्‍याची पाटी कोरी झाली पाहिजे आणि नव्याने त्याला पाटीवर इतिहास लिहता आला पाहिजे,यादृष्टीने आम्ही हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपच्या प्रदेश समितीच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभावेळी ते बोलत
होते. कर्जमाफी आणि थकीत बिलांच्या मुद्द्यावर मी नेहमीच राज्याच्या आर्थिक शिस्तीबद्दल स्पष्टपणे बोललोय. मात्र आमच्या महायुतीतील काही सहकारी मंडळींनी जेव्हा माझ्याशी याबाबत चर्चा केली. तेव्हा आम्ही शेतकर्‍यांच्या हितासाठी सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला.पुढे मुख्यमंत्री म्हणाले, जर आम्हाला केवळ आणि केवळ राजकारणच करायचे
असतं, तर 2029 च्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटी आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला असता. परंतु, आम्ही शेतकर्‍यांच्या हिताच्या आड कधीही राजकारण आणणार नाही. राजकारण आम्ही करूच, ते तर करावंच लागेल, पण बळीराजाच्या जीवावर करणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि नव्या तंत्रज्ञानाचा विचार
करुन शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याची गरज असल्याचं म्हटलंय. राज्यातील 76 टक्के शेतकर्‍यांना आपण दिवसा वीज देत आहोत. या वर्षाअखेर आपला प्रयत्न आहे की, आपण 100 टक्के शेतकर्‍यांना दिवसा मोफत वीज देण्याचा प्रयत्न करु, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 2014 नंतर आपण शेती क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक केली. त्यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे या योजना राबवल्या. महाराष्ट्रात लाखो शेततळी निर्माण झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button