प्रश्न मांडण्यापेक्षा दोन कानफाडीत माराव्या वाटतात

बच्चू कडूंचा सभागृहात संताप

मुंबई /10 जुलै : विधान परिषदेत आज (10 जुलै) नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेत सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभागासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग, अनाथ, एकल महिला आणि
भिक्षेकरी यांच्या प्रश्नांकडे सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा मुद्दा उपस्थइत करत प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका
करताना संताप व्यक्त केला. मात्र त्याचवेळी त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे तो शब्द सभागृहाच्या कामकाजातून वगळ्यात आला आहे. बच्चू कडू यांनी भाषणाच्या सुरुवातीला दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात स्थापन झाल्याचा आनंद आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. कारण दिव्यांगांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव, विविध
प्रलंबित मागण्या आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवायचे निर्णय एक वर्ष उलटूनही पुढे सरकलेले नाहीत. त्यामुळे
प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अवहेलना होत आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच अधिकारी जर आदेश
पाळत नसतील, तर कारवाई मंत्र्यांवर करायची की सचिवावर? असाही प्रश्न त्यांनी सभागृहात विचारला. बच्चू कडू यांनी दिव्यांगांसाठी दरमहा आर्थिक मदत, स्वतंत्र उद्योग व क्रीडा धोरण, अंत्योदय योजनेचा लाभ, बजेटमध्ये कायद्यानुसार 5 टक्के निधी, राष्ट्रीय व राज्यस्तरीय निधीची निर्मिती, आधुनिक इलेक्ट्रिक वाहनांचे वाटप, मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतर शिक्षणाची
व्यवस्था आणि विविध सरकारी भरतींमध्ये अतिरिक्त गुण देण्याची मागणी केली. तसेच प्रत्येक आमदाराने आपल्या निधीतून
दिव्यांगांसाठी किमान 30 लाख रुपये खर्च करावेत आणि प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारावे, अशी सूचनाही
सभागृहात केली. बच्चू कडून यांनी विशेष साहाय्य योजनेंतर्गत दिव्यांगांकडून आवश्यक नसलेली कागदपत्रे मागितली जात असल्याचा मुद्दा सभागृहात मांडला. मात्र हा मुद्दा मांडताना बच्चू कडू चांगलेच संतापले होते आणि ते रागाच्या भरात म्हणाले की, ‘कधी कधी प्रश्न मांडण्यापेक्षा दोन कानफाडीत माराव्या वाटतात.’ मात्र बच्चू कडूंच्या या वक्तव्यावर उपसभापती सचिन अहिर यांनी आक्षेप घेतला आणि त्यांचा हा शब्द सभागृहाच्या कामकाजातून वगळत असल्याचे सांगितले. त्यानंतर बच्चू कडू यांनीही आपली चूक मान्य केली आणि बरोबर आहे, थोडंसं डीएनएमध्ये किंवा रक्तातला दोष आहे. मी सॉरी बोलतो, चुकून शब्द आला, असे स्पष्टीकरण दिले.

संबंधित बातम्या

Back to top button