शिक्षकाने अभ्यासाकरिता रागावणे म्हणजे विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे
नागपूर उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

नागपूर/10 जुलै -शिक्षकाने अभ्यास किंवा शिस्तीकरिता रागावणे म्हणजे विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी बुलडाणा जिल्ह्यातील एका प्रकरणामध्ये दिला आहे. तसेच, संबंधित शिक्षकाविरोधातील गुन्हा अवैध ठरवून रद्द केला आहे. गोपाल सूर्यवंशी, असे शिक्षकाचे नाव असून ते लखनवाडा, खामगाव येथील रहिवासी आहेत. ही घटना 1 जुलै 2025 रोजी नांदुरा तालुक्यातील वासाडी (बु.) येथील
जय बजरंग शाळेत घडली.शिक्षकाने वर्गात शिकवत असताना विद्यार्थी विवेकला विज्ञानातील एका संकल्पनेची व्याख्या विचारली.
विवेकला त्याचउत्तर देता आले नाही. त्यामुळे शिक्षकाने त्याला 100 उठाबशा काढायला सांगितल्या. विवेकने 20-25 उठाबशा काढल्यानंतर पायाला दुखापत असल्याचे सांगत अधिक उठाबशा काढण्यास नकार दिला. त्यामुळे सूर्यवंशी यांनी संतापून त्याला अत्यंत कडक शब्दांत सुनावले. या अपमानास्पद वागणुकीमुळे दुखावलेला विवेक शाळेच्या मधल्या सुट्टीत घरी निघून गेला
आणि त्याने स्वतःच्या शेतातील एका पडक्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये शिक्षकाच्या वाईट वागणुकीचा उल्लेख होता. त्यावरून पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला होता.




