पक्षांतर करणे डॉ.आंबेडकर यांच्या घटनेने दिलेला अधिकार
मंत्री सामंतांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नागपूर /26 जून: देशात 1985 च्या 52 व्या घटनादुरुस्तीनुसार देशात पक्षांतर बंदी कायदा आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी आम्ही पक्षांतर करणे, आम्ही आमचा विचार बदलणे, हा आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिलेला अधिकार आहे, असे वक्तव्य केले. यातून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नेमक काय म्हणाले उदय सामंत
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी, विशेषत: संजय राऊत यांनी या सहा खासदारांवर जोरदार टिका केली. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही पक्षांतर करणे, आम्ही आमचा विचार बदलणे, हा आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिलेला अधिकार आहे. संविधानाच्या नियमात बसून जर आम्ही ते करत आहोत तर त्यावरून कुणी शिविगाळ कशाला करायची. चार साडेचार वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारणार्यांना आई-बहिणी वरून शिव्या घालण्यात आल्या. खूनाची धमकी, तुडवतो म्हणून धमक्या देण्यात आल्या. वादाची सुरुवात कुठून होते, याचा विचारही करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
शिंदे यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची मविआच्या आमदारांची इच्छा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात दररोज पक्षप्रवेश होत आहे. त्यामुळे ऑपरेशन एक,लागेल, असेही सामंत म्हणाले. महाविकास आघाडीच्या आमदारांची इच्छा एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारण्याची असेल तर आम्ही का नाकारावं?, असा सवाल करीत संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रतिनिधीमध्ये ही इच्छा तयार झालेली आहे हे नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.
त्या’ सहा खासदारांना एकनाथ शिंदे नक्कीच निवडून आणतील
अमरावती- शिवसेना उद्धव ठाकरे गटातील फुटीर सहा खासदारांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर यांचा या खासदारांत समावेश आहे. त्यानंतर ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. आता या खासदारांचे पुढील राजकीय भवितव्य काय, असा प्रश्न चर्चेत असताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हे खासदार नक्कीच निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. उदय सामंत यांचे आज अमरावती शहरात आगमन झाले. त्यांनी येथील हॉटेल गौरी इनमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेतली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी उठावाच्या वेळी शिवसेनेचे चाळीस आमदार आणि दहा अपक्ष आमदार यांच्यात वाढ होईल आणि महायुतीचे दोनशेहून अधिक आमदार निवडून येतील, असे भाषणात सांगितले होते. आमचे साठ आमदार निवडून आले. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करणार्या सहा खासदारांना ते शंभर टक्के निवडून आणतील, त्यात शंका बाळगण्याचे कारण नाही. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे.
उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे आधी महाराष्ट्रात फिरले असते, तर त्यातून चांगले परिणाम दिसून आले असते, पण आता सगळेच निघून गेल्यानंतर फिरून काय मिळणार आहे. महाविकास आघाडी पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. कुणाशीही कुणाचा संबंध राहिलेला नाही. आपल्यात कोण मोठे आहे, अशी चढाओढ महाविकास आघाडीत लागलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दौर्याचा विदर्भावर काहीच परिणाम होणार नाही. या ठिकाणी वाढेल, ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना वाढेल.
‘आमदारांची इच्छा असेल, तर का नाकारणार’-एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारण्याची आमदारांची इच्छा असेल, तर ते आम्ही का नाकारावे? ते पक्षात येत असतील, तर त्यांना येऊ नका, असे आम्ही का सांगावे? महाराष्ट्रातील आमदारांमध्ये हे वातावरण निर्माण झाले आहे, हे नाकारता येणार नाही. पक्षात येणार्यांचे आम्ही स्वागतच करू, असे उदय सामंत म्हणाले.




