सहाही खासदार शिवसेनेच्या तिकिटावर लढणार
भाजप, राष्ट्रवादीचे काय?

मुंबई/22 जून-ठाकरे गटातून आलेल्या 6 खासदारांच्या राजकीय भविष्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीच्या जागांवर निवडून आलेल्या या खासदारांना पुन्हा शिवसेनेचेच तिकीट मिळणार असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.
ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर, महायुतीमधील जागावाटपाचा पेच आणि या खासदारांचे राजकीय भविष्य यावर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या सर्व चर्चांना आणि वादाला पूर्णविराम देत शिंदे यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. प्रवेश केलेले सर्व 6 खासदार आगामी लोकसभा निवडणूक शिवसेनेच्याच (धनुष्यबाण) तिकिटावर लढणार आणि पुन्हा महायुतीचे खासदार म्हणून निवडून येणार, असे शिंदेंनी ठणकावून सांगितले आहे.
’त्या’ जागांवरून महायुतीत पेच निर्माण होणार?-उद्धव ठाकरे यांच्या गटातून आलेल्या या 6 खासदारांपैकी काही खासदार हे 2024 च्या निवडणुकीत खुद्द शिंदेंच्या उमेदवारांविरोधात, तर काही जण भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव करून संसदेतपोहोचले आहेत. लोकसभेला जागावाटपाचे गुर्हाळ अखेरपर्यंत सुटले नव्हते, त्याचा फटका महायुतीला बसला होता. तीन्ही पक्ष एकमेकांना जागा सोडण्यास तयार नव्हते. यामुळे उबाठाच्या सहा खासदारांचे भविष्य काय असे प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. धाराशीवमध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांचा पराभव केला होता. तर संजय दिना पाटील यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव केला होता. इतर चार खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव केला होता. हे खासदार आता शिंदे गटात आल्यामुळे, 2029 च्या किंवा पुढील लोकसभा निवडणुकीत या जागांवर हक्क कोणाचा? भाजप आणि राष्ट्रवादी आपल्या हक्काच्या जागा शिवसेनेला सोडणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, शिंदेंनी केलेल्या या थेट घोषणेमुळे आता महायुतीतील मित्रपक्षांची (भाजप आणि राष्ट्रवादी) डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कार्यकर्त्यांच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी जागा राखणार-या संदर्भात बोलताना शिंदे म्हणाले, हे सर्व खासदार जमिनीवर काम करणारे लोकनेते आहेत. मतदारसंघाचा विकास आणि मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठीच त्यांनी बाळासाहेबांच्या खर्या शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या जागांवर आणि त्यांच्या उमेदवारीवर कोणताही प्रश्न उरत नाही. महायुतीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र बसून हा निर्णय घेतला असून, हे सहाही टायगर पुढील निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर मैदानात उतरतील.




