30 वर्ष लढलो, पण काँग्रेसने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही
उद्धव ठाकरे यांचा अमित शाह यांच्यावर निशाणा

मुंबई/21 जून–महाराष्ट्राच्या राजकारणात ’ऑपरेशन टायगर’मुळे खळबळ माजली असतानाच, शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर सभेतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहआणि पक्षाशी बंडखोरी करणार्या 6 खासदारांवर अत्यंत आक्रमक आणि बोचरी टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख एकच होऊन गेले, दुसरा कोणी होऊच शकत नाही आणि लोक ते कधी स्वीकारणारही नाहीत. तू तुझ्या औकातीत राहा, शिवसेनाप्रमुख कोण हे तुझ्यासारखा उपरा ठरवू शकत नाही, अशा अत्यंत कडक शब्दांत ठाकरेंनी अमित शाह यांना सुनावले.
उद्धव ठाकरे यांच्या ’यूबीटी’ गटातील 9 पैकी 6 खासदारांनी पुन्हा एकदा बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. यामध्ये नागेश अष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासह 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे गटात जाण्याची तयारी केली आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे भावूक आणि आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून तुम्हाला मशालीवर निवडून दिलं होतं. आता जिथे जिथे ही गद्दारी झाली आहे, त्या त्या मतदारसंघात मी स्वतः जाऊन जनतेची, मतदारांची माफी मागणार आहे, अशी मोठी घोषणा ठाकरेंनी केली. शनिवारी कोल्हापूरच्या सभेत अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांची ’शिवसेनाप्रमुख/अध्यक्ष’ म्हणून ओळख करून दिली होती आणि तीच खरी शिवसेना असल्याचे म्हटले होते. यावर पलटवार करताना ठाकरे म्हणाले, तुमच्या भाजपमध्ये कोणीही उठतो आणि त्याला अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवले जाते. भाजपला कोणताही अध्यक्ष चालतो. पण शिवसेनाप्रमुख फक्त आणि फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे एकच होऊन गेले, दुसरा होणे नाही! आज तुझ्या बुडाखाली खुर्ची आहे म्हणून लोक तुला घाबरतात.




