खुली डीपी मृत्यूला आमंत्रण देणारी ठरतेय
वडाळीतील गलथान कारभाराविरोधात नागरिक संतप्त

मद्यधुंद कर्मचार्यांमुळे लोकांच्या जिवाला धोका
अमरावती/16 जून- अमरावती येथील वडाळी महानगरपालिका शाळा क्रमांक 14 ला लागून असलेल्या विद्युत वितरण केंद्राच्या डीपी पेटीचे झाकण उघडे असल्याने विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. येथील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी कमालीचे ढीले असून, केंद्रामध्ये मद्य पिऊन धुंद राहतात. त्यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नसून तक्रार केंद्राचा दूरध्वनीही नेहमी बंद असतो. या भोंगळ कारभारामुळे मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. कार्यकारी अभियंता यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी नगरसेवक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वात आता जोर धरत आहे.
वडाळी परिसरातील या मुख्य ठिकाणी नेहमीच नागरिकांची आणि लहान मुलांची मोठी वर्दळ असते. अशातच शाळेला लागूनच असलेली वीज पेटी उघड्या अवस्थेत असणे म्हणजे मृत्यूला उघडे आमंत्रण देण्यासारखे आहे. येथील वीज कर्मचारी नेहमीच नशेत चुर राहून कर्तव्यात कसुरी करत असल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे. अनेकदा तक्रार करूनही अधिकारी याकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. केंद्राचा संपर्क क्रमांक बंद असल्याने ऐनवेळी आपत्कालीन स्थितीत कोणाशी संपर्क साधावा, असा मोठा प्रश्न वडाळीतील जनतेला पडला आहे. वीज वितरणच्या या निष्क्रीय कारभारामुळे लोकांमध्ये तीव्र संताप असून वरिष्ठ अधिकार्यांनी या मद्यधुंद वायरमनवर कडक कारवाई करावी, अन्यथा मोठा उद्रेक होईल असा इशारा नगरसेवक संजय चव्हाण यांनी दिला आहे. संजय चव्हाण नगरसेवक यांची मागणी! वडाळी शाळा परिसरातील उघडी वीज पेटी आणि मद्यधुंद कर्मचार्यांचा कारभार लहान मुलांच्या जिवावर बेतू शकतो. वारंवार फोन बंद ठेवून कर्तव्यात कसूर करणार्या या निष्क्रीय वायरमनवर वरिष्ठांनी कठोर कारवाई करावी आणि ती खुली डीपी पेटी त्वरित बंद करावी, अशी आक्रमक मागणी संजय चव्हाण नगरसेवक यांनी प्रशासनाकडे लावून धरली आहे.




