मतदान प्रक्रियेबाबत मतदारांमधील संभ्रम दूर

फक्त एक आकडा लिहिल्यावर मतदान वैध

* इतर उमेदवारांना पसंतीक्रम देणे ऐच्छिक

अमरावती/16जून- 18 जून रोजी होणार्‍या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत निर्माण झालेला संभ्रम जिल्हा निवडणूक प्रशासनाने दूर केला आहे. अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे की, जर मतदाराने केवळ आपल्या पसंतीच्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य (1) दिले आणि इतर उमेदवारांना कोणताही पसंतीक्रम दिला नाही, तरीही त्याचे मत पूर्णपणे वैध मानले जाईल.
या निवडणुकीत एकूण 453 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक लढत त्रिकोणी असल्यामुळे मतदारांमध्ये प्राधान्यक्रमानुसार मतदान करण्याच्या पद्धतीबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. मागील काही दिवसांपासून तिन्ही उमेदवारांना अनुक्रमे 1, 2 आणि 3 असे अंक देणे बंधनकारक आहे, अन्यथा मतपत्रिका बाद होईल अशी चर्चा सुरू होती. निवडणूक विभागाने ही अफवा पूर्णपणे फेटाळून लावली आहे. मतपत्रिकेवर केवळ 1 हा अंक नोंदवला आणि उर्वरित उमेदवारांना कोणताही क्रमांक दिला नाही, तरीही मतमोजणीत त्याची गणना केली जाईल. जिल्हा निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मतदारांना पसंतीक्रम नोंदवण्यासाठी केवळ निवडणूक आयोगाद्वारे उपलब्ध विशेष मार्कर पेनचाच वापर करावा लागेल. इतर कोणत्याही पेनचा वापर केल्यास मतपत्रिका अवैध घोषित केली जाऊ शकते. उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजीराव शिंदे यांनी सांगितले की, मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि नियमबद्ध आहे. मतदारांनी निवडणूक आयोगाच्या नियमांनुसारच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मतदान करावे.

संबंधित बातम्या

Back to top button