शिवरायांची 400 वी जयंती जागतिक स्तरावर भव्य साजरी करणार

पारंपरिक पद्धतीने शिवजन्म सोहळा उत्साहात

शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुणे /19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन 2030 मध्ये होणार्‍या 400 व्या जयंतीनिमित्त भव्य आणि जगाचे लक्ष वेधून घेणारा सोहळा साजरा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरी येथे केली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून शिवजन्म सोहळा उत्साहात पार पडला. त्यानंतर पोलिस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी शिवप्रतिमेची पालखीही वाहिली.
मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून रयतेचे स्वराज्य उभे केले. समता, न्याय, स्त्रीसुरक्षा आणि सुटसुटीत करप्रणाली ही त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये होती. भविष्यातील धोके ओळखून त्यांनी जलदुर्ग उभारले व किनारपट्टी सुरक्षित केली. पंतप्रधानांच्या पुढाकाराने शिवनेरीसह शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. राज्यातील गड-किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय राबविल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवरायांचे धैर्य, दूरदृष्टी आणि सुशासन आजही मार्गदर्शक आहे. गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन अधिक वेगाने करण्यात येईल. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त किल्ले स्वच्छता व जतन मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

संबंधित बातम्या

Back to top button