मालमत्ता कराची वसुली वेगाने पूर्ण करा

थकबाकीदारांवर कठोर कारवाईचे आयुक्तांचे थेट आदेश

अमरावती /4 ऑगस्ट-अमरावती महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य कणा असलेल्या मालमत्ता कराची वसुली वेगाने करून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी मालमत्ता कर विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत अधिकारी आणि कर्मचार्‍यांना कामाची गती वाढवण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
रोजच्या अन् आठवड्याच्या वसुलीचे नियोजन करून मोठ्या थकबाकीदारांच्या थेट घरी जाणे, नोटिसा बजावणे आणि प्रसंगी कायद्याचा बडगा उगारून वसुली करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. नागरिकांनी सहज कर भरावा यासाठी ऑनलाईन व्यवस्थेचा प्रचार करावा आणि करदात्यांच्या अडचणी लगेच सोडवून त्यांच्याशी संवाद वाढवावा, असेही त्यांनी सांगितले. शहरात चांगले रस्ते, पाणी, स्वच्छता अन् इतर सोयीसुविधा पुरवण्यासाठी हा निधी अत्यंत गरजेचा असून सर्वांनी एकत्रितपणे गतीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत विभागातील अधिकार्‍यांनी मागील वर्षाच्या तुलनेतील प्रगती, प्रलंबित प्रकरणे आणि महसूल वाढीच्या उपायांचे सादरीकरण केले. ज्या भागांत वसुली कमी आहे तिथे विशेष लक्ष देण्याचे सांगत आयुक्तांनी नव्या बांधकामांची नोंद करणे, माहिती संगणकीकृत करणे आणि सर्व पर्यायांचा वापर करण्याचे निर्देश दिले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, मुख्य लेखाधिकारी शिल्पा पवार, सहाय्यक संचालक नगर रचना अधिकारी वैशाली गाठो, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिगिले, भूषण पुस्तके, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, मनोज शहाळे, सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी नर्मदा चव्हाण, प्रवीण ठाकरे, अतिक्रमण पथकप्रमुख अजय बनसोले, हरीष संतोसिया यांच्यासह इतर सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button