वादळी पावसानंतर महानगरपालिका प्रशासन सतर्क

आयुक्त वर्षा लड्डा यांची राजापेठ व बेलपुरा परिसरात प्रत्यक्ष पाहणी

अमरावती /15 जून: अमरावतीत रविवारी झालेल्या जोरदार पावसाने शहराची दाणादाण उडवली. अनेक सखल भागात गुडघाभर पाणी साचले असून, वादळी वार्‍यामुळे रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आयुक्त वर्षा लड्डा यांनी प्रत्यक्ष पाहणी करून युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
रविवार्‍याच्या पावसाचा तडाखा बसल्यानंतर सोमवारी सकाळी आयुक्तांनी राजापेठ आणि बेलपुरा परिसरात पाहणी केली. पावसाचे पाणी तुंबणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्यांनी भुयारी गटारांची तातडीने स्वच्छता करण्याचे आणि पावसाळ्याच्या काळात नाल्यांची नियमित देखभाल करण्याबाबत अभियंत्यांना खडसावले. दुसरीकडे, वादळामुळे पडलेली झाडे आणि फांद्यांनी रस्ते अडवले होते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेचा उद्यान विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक रात्रभर मैदानात उतरले होते. विशेष मोहिमेद्वारे रस्ते मोकळे करण्यात आले. आयुक्तांनी सर्व विभागांना आपापसात ताळमेळ राखून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला पूर्ण क्षमतेने सज्ज राहण्यास सांगत, पावसाळ्याच्या काळात नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यातील संकटांचा अंदाज घेत हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यांनुसार सज्ज राहावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. आपत्कालीन स्थितीत नागरिकांनी महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. या पाहणी दौर्‍यात उपायुक्त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता रवींद्र पवार, सहाय्यक आयुक्त भूषण पुस्तक, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, आपत्कालीन प्रमुख दिनेश हंबर्डे, अभियंता लक्ष्मण पावडे, आरोग्य अधीक्षक विजय बुरे, ज्येष्ठ आरोग्य निरीक्षक श्रीकांत दावरे, कुंदन हडाळ, आरोग्य निरीक्षक आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button