जिल्हा परिषदेच्या शाळा खासगी शाळांपेक्षा अधिक चांगल्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मुंबई/15 जून- राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा 90 टक्के खाजगी शाळांपेक्षा अधिक चांगल्या आहेत, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला आहे. रायगड जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत डिजिटल प्रयोगशाळेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळांबद्दलची नकारात्मक धारणा आता बर्‍याच अंशी दूर झाली आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर करण्यासाठी राज्य सरकार संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये अशाच प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. मी खात्रीने सांगू शकतो की, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिले जाणारे शिक्षण हे 90 टक्के खाजगी शाळांच्या तुलनेत अधिक चांगले आहे. एका काळी जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस आलेल्या इमारतींमधून चालत असत आणि तिथे मूलभूत सुविधांचा अभाव असे, परंतु आज त्यातील बहुतांश शाळा खाजगी शाळांच्या बरोबरीच्या आणि काही बाबतीत तर त्यापेक्षाही सरस झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेला कमी दर्जाचा शिक्का आता पुसला गेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये खाजगी शाळांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या डिजिटल प्रयोगशाळेमुळे सर्व इयत्तांसाठी दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) अभ्यासक्रम उपलब्ध होईल आणि ऑनलाइन परीक्षा घेणेही शक्य होईल. शिक्षक याचा वापर अध्यापनासाठी करू शकतील आणि तिथेच ऑनलाइन परीक्षाही घेतल्या जातील.आजच्या डिजिटल युगात, विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर करण्यासाठी हे एक उत्कृष्ट साधन आहे. मुलांना घटनात्मक मूल्ये आणि नागरिक म्हणून त्यांची कर्तव्ये यांची ओळख करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू करण्यात आले आहे.आपल्या मुलांना घटनात्मक मूल्यांची माहिती असायला हवी. त्यांना केवळ त्यांचे हक्कच नाही, तर त्यांची कर्तव्येही समजली पाहिजेत. तसेच स्वच्छता आणि पर्यावरणाबाबतही जागरूकता निर्माण केली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button