मान्सून काळातील आपत्कालीन परिस्थितीसाठी विभागात 24 तास नियंत्रण कक्ष सज्ज

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

* विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे आवाहन

अमरावती/29 मे-अमरावती विभागामध्ये मान्सूनच्या कालावधीत निर्माण होणार्‍या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. मान्सूनच्या काळात अतिवृष्टी, पूर किंवा अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे नागरिकांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने विभागीय आयुक्त कार्यालयासह विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिय) ‘आपत्कालीन नियंत्रण कक्ष’ स्थापन करण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी मदतीसाठी प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.शासनाच्या विशेष निर्देशा नुसार, हे सर्व आपत्कालीन नियंत्रण कक्ष 24 तास आणि 365 दिवस अविरतपणे सुरू ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरून कोणत्याही क्षणी नागरिकांना तातडीची मदत, बचावकार्य आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे प्रशासनाला शक्य होईल.नागरिकांच्या सुविधेसाठी जिल्हानिहाय संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले असून, विभागीय आयुक्त कार्यालयासाठी 0721-2661364 आणि अमरावती जिल्ह्यासाठी 0721-2662025 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. तसेच अकोला (0724-2424 444), यवतमाळ (07232- 240720), बुलढाणा (07262-242683) आणि वाशिम (07252-234238) येथील नियंत्रण कक्षांशी नागरिकांना संपर्क साधून आवश्यक ती मदत मिळवता येईल.

संबंधित बातम्या

Back to top button