महाविकास आघाडीचे विधान परिषदेच्या 15 जागांवर मतैक्य, नांदेड, नाशिकवर तिढा

मुंबई/29 मे-महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज झालेल्या बैठकीत विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा बव्हंशी सोडवण्यात यश मिळाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या माहितीनुसार, 17 पैकी तब्बल 15 जागांवर आघाडीतील तिन्ही घटकपक्षांमध्ये एकमत झाले. त्यात काँग्रेसने 8, उद्धव ठाकरे गटाने 4, तर शरद पवार गटाने 3 जागांवर दावा केला आहे. उर्वरित 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असली तरी, आघाडीत समन्वय राखत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतैक्य होणे हे सत्ताधारी महायुतीविरोधात एकजुटीचे संकेत देणारे मानले जात आहे.
महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने 2 दिवसांपूर्वी आमची प्राथमिक चर्चा झाली होती. आज अंतिमतः जागावाटपाच्या अनुषंगाने बैठक झाली. 17 पैकी 15 जागांवर आमचे एकमत झाले आहे. 2 जागांवर आमची चर्चा सुरू आहे. पुढील 2 दिवसांत या 2 जागांवरही निर्णय होईल. नांदेड व नाशिक या 2 जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. यासंदर्भात 2 जागा वगळता इतर ठिकाणी जागावाटपाचा निर्णय झाला आहे. त्यात काँग्रेस चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा – गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव- बीड- लातूर, नागपूर या 8 जागांवर निवडणूक लढवेल. शिवसेना ठाकरे गट हा रत्नागिरी, जळगाव, परभणी – हिंगोली व संभाजीनगर या 4 जागा लढवेल. राष्ट्रवादी (शरद पवार) हा पक्ष पुणे, ठाणे, सातारा- सांगली या 3 जागांवर लढणार आहे. एकंदरीत या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरे जात आहोत. भाजपच्या घोडेबाजाराला न जुमानता आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी व सुसंस्कृत सभ्यपणा टिकवून ठेवण्यासाठी या निवडणुकीत आम्ही आमच्या घटनात्मक मूल्यांचा व महाराष्ट्र धर्माचा जागर करण्यासाठी या निवडणुकीला सामोरे जात आहोत.




