यंत्रमानव नव्हे, डॉक्टरच देवदूत ठरणार
तंत्रज्ञान प्रगती पथावर, तरी माणुसकीच थोर

अमरावती/10 मे- वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला तरी तो प्रत्यक्ष डॉक्टरांची जागा घेऊ शकणार नाही, असा ठाम विश्वास सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञान केवळ उपचारांना गती देऊ शकते, मात्र रुग्णाला मायेचा हात आणि विश्वासाचा शब्द केवळ डॉक्टरच देऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमरावतीच्या डॉ. राजेंद्र गोडे शैक्षणिक संकुलात ’टेड-एक्स’ या जागतिक विचारपीठावर ’यंत्रमानव डॉक्टरांची जागा घेईल का?’ या विषयावर चर्चासत्र रंगले होते. संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र गोडे यांच्या प्रेरणेतून आणि सचिव तन्वी गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. सागर जिरापुरे यांनी या अभिनव उपक्रमाचे नियोजन केले होते. डॉ. सुपे यांनी अत्यंत सोप्या भाषेत आधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी संवेदना यांचा मेळ घालून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आजच्या काळात ’चॅट-जीपीटी’ सारखी साधने माहितीचे विश्लेषण पटकन करतात, पण आजाराच्या क्लिष्ट परिस्थितीत शेवटचा निर्णय घेताना मानवी बुद्धी आणि अनुभवाचीच गरज लागते. विशेषतः शस्त्रक्रिया, यकृत विकार आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत यंत्रांपेक्षा मानवी संवेदना अधिक प्रभावी ठरतात. चीनमधील यंत्रमानव रुग्णालयाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, तिथे प्राथमिक कामे यंत्रे करत असली, तरी रुग्णाचे मन समजून घेण्यासाठी डॉक्टरच लागतात. याप्रसंगी डॉ. योगेश गोडे, डॉ. एस. एस. हटककर, डॉ. सागर जिरापुरे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. गौरव धाडसे, प्रा. रवी श्रीवास, डॉ. अमोल मोरे, डॉ. आर. पी. सरोदे, प्रा. वैभव फुलारी, प्रा. एस. पी. चिंचोलकर आणि प्रा. बी. एस. मेत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.




