जिल्ह्यातील पशुधनासाठी ‘आता 1962’ वरून जीवनदान

दवाखाना थेट पशुपालकांच्या दारापर्यंत पोहचणार पशुधन वाचवण्यासाठी शासनाचा मोठा पुढाकार

अमरावती/10 मे- अमरावती जिल्ह्यातील पशुपालकांसाठी आनंदाची बातमी असून आता आपल्या जनावरांच्या उपचारासाठी धावपळ करण्याची गरज उरणार नाही. शासनाने सुरू केलेल्या 1962 या विनामूल्य क्रमांकावर संपर्क करताच तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक औषधोपचारांसह थेट पशुपालकांच्या घरापर्यंत पोहचणार आहे. यामुळे शेतकर्‍यांचा वेळ आणि पैसा तर वाचणारच आहे, पण त्याचसोबत आजारी जनावरांना वेळेवर उपचार मिळून दुभत्या जनावरांचे होणारे नुकसानही टळणार आहे.
जिल्ह्यातील अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी आणि तिवसा या तालुक्यांमध्ये राज्य पुरस्कृत, तर चांदूर रेल्वे तालुक्यात केंद्र पुरस्कृत फिरता पशुवैद्यकीय दवाखाना कार्यरत झाला आहे. एकूण पाच फिरत्या वाहनांद्वारे ही महत्त्वाची सेवा दुर्गम भागातील पशुधनासाठी पुरवली जात आहे. एखादे जनावर आजारी पडल्यास शेतकर्‍यांना यापूर्वी ते दवाखान्यात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे, मात्र आता केवळ एका भ्रमणध्वनीवरील संपर्कामुळे डॉक्टरच जनावरांच्या गोठ्यात येऊन उपचार करत आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांना 1962 या क्रमांकावर कॉल करावा लागतो. कॉल मिळताच नियंत्रण कक्षाकडून संबंधित तालुक्यातील फिरत्या वाहनाला तात्काळ माहिती दिली जाते. त्यांनतर वाहनातील प्रशिक्षित वैद्यकीय पथक आवश्यक औषधे आणि साधनांसह शेतकर्‍याच्या घरी पोहचते. तिथे जनावराची तपासणी करून रोगाचे निदान केले जाते आणि तात्काळ उपचार सुरू केले जातात. ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असून केवळ प्राथमिक नोंदणीनंतर बहुतांश सेवा सवलतीच्या दरात किंवा मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील पशुधनाचे आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button