अकोल्यात व्यापार्याचा सावकारी पाश; झंवर अन् सांगलीवालाने सोमाणींना लुटले
36 टक्के व्याजाचा ’धडाका’ आणि अडीच कोटींचा प्लॉट हडपण्याचा कट

उपनिबंधकांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे; झंवर पाच वर्षांपासून फरार?
अकोला/23एप्रिल ; अकोल्याच्या व्यापारी जगतात मैत्रीच्या नावाखाली सुरू असलेल्या एका मोठ्या आर्थिक गुन्हेगारीचा पर्दाफाश झाला आहे. प्रकाश जानकीलाल सोमाणी आणि जानवी सोमाणी या दांपत्याला व्याजाच्या जाळ्यात ओढून त्यांची कोट्यवधींची मालमत्ता हडपण्याचा डाव विनोद झंवर आणि सांगलीवाला शोरूमच्या कार्तिकने आखल्याचे उपनिबंधकांच्या चौकशीत उघड झाले आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, अव्वाच्या सव्वा व्याज आकारून सोमाणी कुटुंबाची तब्बल 1.32 कोटींची लूट करण्यात आली असून, उपनिबंधकांनी या व्यवहारावर ’अवैध सावकारी’चा शिक्का मारला आहे.
या गुन्हेगारी प्रकरणाची सुरुवात 18 टक्के व्याजाच्या आमिषाने झाली, मात्र झंवर यांनी प्रत्यक्षात 36 टक्क्यांनी वसुली सुरू केली. व्याजाचा हा आकडा 75 लाखांच्या पार गेल्यावर तडजोड करण्यात आली. सोमाणी यांनी 67.80 लाख रुपये देऊनही झंवर यांची भूक शमली नाही. त्यांनी 2.25 कोटी रुपये किमतीचा सोमाणी यांचा प्लॉट हडपण्यासाठी उर्वरित 92.76 लाख रुपये देण्यास स्पष्ट नकार दिला.उपनिबंधक ज्योती यांनी केलेल्या तपासात गुन्हेगारीची मोठी साखळी समोर आली आहे. 1 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या अनेक संशयास्पद खरेदीखतांमध्ये विनोद झंवर हाच मुख्य साक्षीदार असल्याचे आढळले आहे. तसेच जानवी सोमाणी यांच्या लेटरहेडवर घेतलेल्या सह्या आणि तारखा नसलेले 10 कोरे धनादेश हे अवैध सावकारीचे सर्वात मोठे आणि जिवंत पुरावे ठरले आहेत. महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 च्या कलम 18 (1) नुसार हा गुन्हा सिद्ध होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 2021 पासून सुरू असलेल्या या चौकशीला विनोद झंवर यांनी एकदाही हजेरी लावली नाही. आता या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारावर जिल्हा उपनिबंधक काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
तपासातील सर्वात मोठे पुरावे-तपासात असे निष्पन्न झाले की, झंवर आणि सांगलीवाला यांनी संगनमताने सोमाणी यांची मालमत्ता आपल्या नावावर करून घेतली. तक्रारदाराचे कोरे धनादेश स्वतःकडे ठेवणे आणि वारंवार चौकशीला गैरहजर राहणे, यावरून हा संपूर्ण व्यवहार बेकायदेशीर आणि लुटीच्या उद्देशाने केल्याचे स्पष्ट झाले आहे.




